मंडळ अध्यक्ष नेमणुकीत आयात आमदारांचे फावले !

मर्जीतील व्यक्तींची नेमणूक; भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांत निराशा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th January, 12:02 am
मंडळ अध्यक्ष नेमणुकीत आयात आमदारांचे फावले !

पणजी : गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बहुतांशी आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील भाजप मंडळ अध्यक्षपदी आपल्याच मर्जीतील व्यक्तींची नेमणूक करण्यात यश मिळवल्याने आणि वयाच्या अटीमुळे संधी हुकल्याने भा​जपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये कमालीची निराशा पसरली आहे. याचे पडसाद पुढील निवडणुकांमध्ये दिसून येतील, अशा प्रति​क्रिया काही पदाधिकाऱ्यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.


गेल्या दोन दिवसांत भाजपने ४० पैकी ३६ मतदारसंघांतील मंडळ अध्यक्षांची बिनविरोध नेमणूक केली. त्यात नुवे मतदारसंघ वगळता काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बहुतांशी आमदारांच्या मर्जीतील व्यक्तींचीच या पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. नुवेसह वेळ्ळी, बाणावली आणि मडकई येथील मंडळ अध्यक्षांची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. पुढील काळातील राजकीय आराखडे लक्षात घेऊनच पुढील दोन दिवसांत या चार मतदारसंघांतील मंडळ अध्यक्षांची निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले १८ आमदार भाजपात दाखल झालेले आहेत. त्याव्यतिरिक्त अगोदर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दोन आमदारांनीही भाजपच्या उमेदवारीवर गत विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. या सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात आपल्याच मर्जीतील अध्यक्ष बनवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली होती. त्यात जवळपास सर्वांनाच यश मिळालेले आहे. अशा स्थितीत अनेक वर्षे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करूनही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.