मंत्री, आमदारांच्या गाठीभेटी; आज कोअर समितीशी बैठक
पणजी : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असताना आणि प्रदेश भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होत असताना राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग रविवारी गोव्यात दाखल झाले आहेत. मंत्री, आमदारांकडून त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा तोंड फुटले असून ते सोमवारी आज कोअर समितीशी बैठक करणार आहेत.
आतापर्यंत प्रदेश भाजपचे ३६ मतदारसंघांतील मंडळ अध्यक्ष निश्चित झालेले आहेत. त्यांचा सोमवारी गौरव करण्यात येणार असून, त्यासाठी अरुण सिंग गोव्यात आल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दिली जात आहे. परंतु, प्रदेश भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांसह मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात आढावा घेण्यासाठीच पक्षाने सिंग यांना गोव्यात पाठवल्याची माहिती सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली. २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केलेली आहे. त्याच अनुषंगाने विविध मतदारसंघांतील मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. आता जिल्हाध्यक्ष आणि फेब्रुवारीमध्ये प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाला अधिकाधिक बळकटी देऊन गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यात यशस्वी ठरू शकतो, अशा व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्यासाठी सोमवारी कोअर समितीची बैठक घेऊन सिंग पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षपद तानावडेंकडेच हवे : मॉविन
प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रदेश भाजपने माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक आणि दयानंद सोपटे यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत. परंतु, भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या एकही व्यक्ती पात्र नाही. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सदानंद शेट तानावडे यांच्याकडेच ठेवायला हवी. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला त्रास सहन करावा लागू शकतो. याबाबत आपण वरिष्ठ नेत्यांशी बोलणार असल्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.