मी मूळ हिंदू, नंतर धर्मांतरीत : मॉविन गुदिन्हो

बाबूशनाही हिंदू धर्म आवडतो : संजीव देसाईंकडून स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 11:54 pm
मी मूळ हिंदू, नंतर धर्मांतरीत : मॉविन गुदिन्हो

पणजी : आमची मुळे तपासली, तर आम्ही मुळचे हिंदूच. त्यानंतर धर्मांतरित झालो, ही बाब कधीही बदलू शकत नाही, असे वक्तव्य मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दाबोळीतील कार्यक्रमात बोलताना केले. तर, मंत्री बाबूश मोन्सेरात यांनाही हिंदू धर्म आवडत असल्याचे पणजीचे मावळते मंडळ अध्यक्ष संजीव देसाई यांनी स्पष्ट केले.

दाबोळीच्या नव्या मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर मंत्री गुदिन्हो यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, आपल्या ४५ वर्षांतील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. १९८० पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत अनेकांनी मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मी ख्रिश्चन असल्यामुळे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी एका विधानसभा निवडणुकीत कुठ्ठाळीऐवजी सांतआंद्रे मतदारसंघातून लढण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा सल्ला नाकारत आपण कुठ्ठाळीतूनच निवडणूक लढवण्याचे आव्हान स्वीकारले. आणि ती निवडणूक जिंकली, असे गुदिन्हो म्हणाले. 

गुदिन्हो पुढे म्हणाले, दाबोळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण पराभूत होणार, असे अनेकांना वाटत होते. दाबोळीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू असल्यामुळे तेथे आपला टिकाव लागणार नसल्याचे त्यांचे मत होते. याचा फायदा उठवण्यासाठी सुदिन ढवळीकरांनीही प्रयत्न केले होते. परंतु, आपलाच विजय झाला. माझा हिंदूंशी अधिक संबंध आहे. माझी मुळे शोधली, तर मुळचा हिंदूच आहे. त्यानंतर धर्मांतरीत झालो. पण, मी हिंदू असल्याची गोष्ट बदलू शकत नाही, असे गुदिन्हो म्हणाले.

अधिकाधिक हिंदू मते असलेल्या मांद्रे, डिचोली या मतदारसंघांतील जनतेशीही माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमध्येही मी जिंकू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

बाबूशही हिंदू धर्मियांना मदत करतात !

मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनाही हिंदू धर्म आवडतो. हिंदू धर्मियांप्रमाणेच बाबूशही नेहमीच मदतीसाठी तयार असतात. हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांतील नागरिकांना बाबूश मदत करीत असतात, असे पणजी भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष संजीव देसाई यांनी रविवारी पणजीतील कार्यक्रमात बोलताना सांगितले.