नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडूनही पाठिंबा; १५ जानेवारीपर्यंत होणार घोषणा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या सात जण आहेत; परंतु गेल्या काही वर्षांत पक्षाला मिळवून दिलेले यश आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाच कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. पक्षातील बहुतांशी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तानावडे यांनाच पाठिंबा मिळत आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांतील मंडळ अध्यक्षांच्या निवडीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे. १२ जानेवारीला दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा होईल आणि त्यानंतर लगेचच नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. सध्या पक्षाने या पदासाठी माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार दामू नाईक आणि वरिष्ठ नेते दत्ता खोलकर या सात जणांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेली आहेत; परंतु येत्या काळात होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणुकांत घवघवीत यश मिळवण्याच्या अनुषंगाने तानावडे यांनाच प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवले जाऊ शकते, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
तानावडे यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ गतवर्षीच संपुष्टात आला. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्ती करण्यात आली; परंतु त्यानंतरच्या काळात लोकसभा तसेच विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्यामुळे पक्षाने गोव्यासह इतर काही राज्यांतील पक्षांतर्गत निवडणुका स्थगित ठेवत प्रदेशाध्यक्षांना मुदतवाढ दिली होती. त्यामुळे तानावडे अद्यापही प्रदेशाध्यक्षपदी कायम आहेत.
तानावडेच कायम राहण्याची कारणे...
१. भाजप प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यापासून आतापर्यंत राज्यात झालेल्या पंचायत, जिल्हा पंचायत, पालिका, तसेच विधानसभा निवडणुकांत सदानंद शेट तानावडे यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिले आहे.
२. प्रत्येक निवडणुकीत स्वत: मैदानात उतरत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांत उत्साह भरला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्याला खांदा लावत राज्यभर दौरे करून त्यांनी तळागाळातील जनतेला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला.
३. मंत्री, भाजप आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांत कोणत्याही विषयावरून फूट पडू नये, त्यांनी नेहमी संघटित रहावे, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांत त्यांच्याप्रति आपुलकीची भावना आहे. त्यामुळे बहुतांशी कार्यकर्त्यांकडून तानावडेंनाच या पदावर कायम ठेवण्याची मागणी होत आहे.
पक्ष हितासाठी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार : तवडकर
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सभापती रमेश तवडकर यांचेही नाव पक्षांतर्गत चर्चेत आहे. याबाबत तवडकर यांच्याशी संपर्क साधला असता, भाजप कार्यकर्त्यांकडूनच आपल्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनीही आपल्याशी चर्चा केली होती. आतापर्यंत आपण पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पक्षाच्या हितासाठी मला प्रदेशाध्यक्षपद मिळत असेल, तर ते स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले.