पुढील तीन महिने सरकारी खर्चाला कात्री!

परिपत्रक जारी​ : फर्निचर, संगणक, एसी, कार खरेदीवर ३१ मार्चपर्यंत निर्बंध


08th January, 12:03 am
पुढील तीन महिने सरकारी खर्चाला कात्री!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत सरकारी खात्यांना अर्थसंकल्पीय तरतुदींतील २० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यास, तसेच नवी पदे निर्माण करण्यासह फर्निचर, संगणक, झेरॉक्स मशीन, एसी, कार खरेदीवर येत्या ३१ मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. वित्त खात्याचे अवर सचिव प्रणब भट यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे; परंतु मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मार्चमध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे वित्त खात्याकडून परिपत्रक जारी करून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांत सरकारी योजना वगळून अर्थसंकल्पीय तरतुदींतील २० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम खर्च न करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ३१ मार्चपर्यंत सरकारी नोकरीची नवी पदे भरण्यास आणि खात्यांना फर्निचर, संगणक, झेरॉक्स मशीन, एसी, कार आदींसारख्या वस्तूंची खरेदी करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान, नव्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील खर्चाचा आढावा घेतला होता. त्यात सरकारच्या २४ खात्यांनी अर्थसंकल्पातील तरतूदीपैकी केवळ ३० टक्के निधीच खर्च केल्याचे समोर आले होते.
तातडीच्या खर्चासाठी पूर्वपरवानगी घ्या!
निर्देश जारी करूनही सरकारी खात्यांनी पुढील तीन महिन्यांत साहित्य खरेदी करून पुढील आर्थिक वर्षात बिले सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तातडीच्या खर्चाची गरज असेल, तर खात्यांनी वित्त खात्याची परवानगी घेऊनच निधी खर्च करावा, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
वेतन, पेन्शनसाठी निर्बंध नाहीत
नव्या अर्थसंकल्पाआधी वित्त खात्याकडून दरवर्षी सरकारी खात्यांना खर्चाला कात्री लावण्याचे निर्देश दिले जातात. त्यानुसारच यावेळीही निर्बंध लागू करण्यात आले आहेत; परंतु, कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन, विजेची बिले, कर्जाची परतफेड, तसेच योजनांसाठीचे अर्थसाहाय्य यासाठी निर्बंध नसतात. त्यामुळे खात्यांना या गोष्टींसाठी निधी खर्च करता येतो.