युजीसीद्वारे शिक्षक आणि कुलगुरू भरती नियमांमध्ये मोठे बदल
नवी दिल्ली : विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकाच्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठे अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांवर नियुक्तीसाठी नवीन मसुदा तयार केला आहे. यानुसार, आता उमेदवारांना नेट उत्तीर्ण असणे आवश्यक नाही. याशिवाय कुलगुरू पदावरील भरतीचे नियमही बदलण्यात आले आहेत. अलीकडेच, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांनी उच्च शिक्षण संस्थेत प्राध्यापकांची नियुक्ती, पदोन्नती आणि कुलगुरूंच्या भरतीबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
जारी केलेल्या मसुद्यात असे म्हटले आहे की, मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (एमई) आणि मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजी (एमटेक) मध्ये किमान ५५ टक्के गुणांसह पीजी पदवी असलेल्या लोकांना सहायक प्राध्यापक पदावर थेट भरती करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक नाही.
आता उमेदवाराने कोणत्याही विषयात यूजी आणि पीजीचे शिक्षण घेतलेले असेल पण पीएचडी किंवा नेट विषय असल्यास ते प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. उदाहरणार्थ, रसायनशास्त्रात पीएचडी असलेला उमेदवार, गणितात बॅचलर पदवी आणि भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवार आता रसायनशास्त्र शिकवण्यासाठी पात्र आहे. त्याचप्रमाणे, युजी, पीजी व्यतिरिक्त इतर विषयात त्यांची पहिली राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नेटसाठी पात्र ठरलेले विषय शिकवू शकतात.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी उमेदवाराला १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक असणार नाही. संबंधित क्षेत्रात १० वर्षे काम केलेले आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले क्षेत्रतज्ज्ञ या पदासाठी पात्र असतील. आतापर्यंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून १० वर्षांचा कार्यकाळ आवश्यक होता.
नेट विषयांमध्येही सूट देण्यासाठी यूजीसीने मसुदा तयार केला आहे. म्हणजे नेट परीक्षेचा विषय जरी युजी आणि पीजीपेक्षा वेगळा असला तरी संबंधित विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. यूजीसीने तयार केलेल्या मसुद्यात म्हटल्यानुसार, उमेदवारांचा पीएचडी विषय यूजी आणि पीजी विषयांपेक्षा वेगळा असेल तर ते पीएचडी विषयांमधून प्राध्यापक होऊ शकतात. यासाठी यूजी आणि पीजीमध्ये संबंधित विषय अनिवार्य असणार नाहीत.
१) सहायक प्राध्यापक पदावर पदोन्नतीसाठी काय नियम आहेत?
-सहाय्यक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीसाठी उमेदवारांना पीएचडी पदवी असणे अनिवार्य असेल. या पदवीशिवाय उमेदवारांना पदोन्नती मिळू शकणार नाही.
२) आतापर्यंत प्राध्यापक होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक होती?
-आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी पीजी आणि नेटचे विषय समान असणे आवश्यक होते, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे.
३) विषयांचे नियम काय होते?
-आतापर्यंत, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना पीजी आणि नेटचा एकच विषय असणे आवश्यक आहे, परंतु आता ते आवश्यक असणार नाही.