बाबा रामदेव : पतंजली संस्थानचा ३० वा स्थापना दिवस
हरिद्वार : आम्ही येत्या पाच वर्षांत ५ लाख शाळा भारतीय शिक्षण मंडळाशी जोडू. ही शिक्षणातील अभिनव क्रांती ठरेल. योग क्रांतीच्या यशानंतर पाच क्रांती करू शिक्षण, वैद्यक, आर्थिक, वैचारिक-सांस्कृतिक आणि रोग-दु:ख-अपराध-निराशा यापासून मुक्ती देण्याचे मोठे कार्य पतंजलीपासून सुरू करण्यात येणार आहे, असे पतंजली योगपीठाचे अध्यक्ष बाबा रामदेव यांनी सांगितले.
पतंजली संस्थानचा ३० वा स्थापना दिवस पतंजली वेलनेस, हरिद्वार येथील योग भवन सभागृहात साजरा झाला. यावेळी पतंजली योगपीठाचे महासचिव आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते. कार्यक्रमात देशभरातील पतंजली योगपीठ संस्थेचे ६ हजारहून अधिक प्रभार उपस्थित होते.
रामदेव यांनी गेल्या ३० वर्षातील सेवा, संघर्ष आणि साधनेचा परिचय करून दिला आणि पतंजली योगपीठाच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. पतंजली गुरुकुलम, आचार्यकुलम, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण मंडळ आता नवीन प्रतिमान तयार करतील. आपण मुलांना फक्त शब्दांची समज द्यायची नाही, शब्दांच्या आकलनासोबतच त्यांना विषय, आत्मभान, भारताची खरी जाणीव आणि आपल्या अभिमानाची जाणीव द्यायची आहे. आम्ही संपूर्ण जगाची माहिती हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये समाविष्ट करू, ती संपूर्ण जगासाठी अपडेट ठेवू. परंतु त्यातही ८० टक्के मजकूर वेद, दर्शन, उपनिषदे, पुराणांचा असेल, असे ते म्हणाले.
पंतजलीचा नफा फक्त चॅरिटीसाठी
कार्यक्रमात आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, पतंजलीने लोकांना आरोग्य देण्यासाठी अर्थ से परमार्थ ही मोहीम सुरू केली आहे. पतंजलीच्या नफ्यातील १०० टक्के फक्त चॅरिटीसाठी आहे. पतंजलीसाठी भारत हा बाजार नसून एक कुटुंब आहे. पतंजलीची ५०० हून अधिक जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांची टीम सतत संशोधन करत आहे. विज्ञानाचा वापर करून भारताची प्राचीन ज्ञान परंपरा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पतंजलीनेच केले. आज पतंजलीने गुहा आणि गुहांमधून योग बाहेर काढला आहे आणि जगातील २०० देशांतील लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे.