राज्यातील न्यायालयांचा वेग दुप्पटीने वाढला

गतवर्षी ८ हजार अतिरिक्त खटले निकाली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 10:48 pm
राज्यातील न्यायालयांचा वेग दुप्पटीने वाढला

पणजी : राज्यात २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये विविध न्यायालयांद्वारे दुप्पटीहून अधिक खटले निकाली काढण्यात आले. यामध्ये जिल्हा, सत्र व त्या खालील अन्य न्यायालयांचा समावेश आहे. या न्यायालयांनी २०२३ मध्ये ६,०८१ खटले निकाली काढले होते. तर २०२४ मध्ये १४ हजार ७८ खटले निकाली काढण्यात आले. यामध्ये उच्च न्यायालयातील खटल्यांचा समावेश नाही.


निकाली काढण्यात आलेल्या एकूण खटल्यांपैकी ९,५३७ उत्तर गोव्यातील तर ४,५४१ खटले दक्षिण गोव्यातील होते. एका वर्षात ११,१३४ फौजदारी तर २,९४४ खटले निकाली काढण्यात आले. यातील ८,११३ फौजदारी खटले हे उत्तर गोव्यातील तर ३,०२१ खटले दक्षिण गोव्यातील होते. उत्तर गोव्यातील १,४२४ व दक्षिणेतील १,५२० दिवाणी खटले निकाली काढण्यात आले.

संपूर्ण देशाचा विचार करता २०२४ मध्ये १.३४ कोटी खटले निकाली काढण्यात आले. यातील सर्वाधिक ३२.६५ लाख खटले उत्तर प्रदेश मधील होते. त्यानंतर तामिळनाडू (१७.७७ लाख), गुजरात (१२ लाख), कर्नाटक (११.७८ लाख) यांचा क्रमांक लागतो. ३१ डिसेंबर २०२४ अखेरीस संपूर्ण देशात १.६ कोटी खटले प्रलंबित होते.