‘सेव्हिंग्ज’ करणाऱ्यांमध्ये गोवा देशात पहिल्या स्थानावर

बचतीचा दर ४९ टक्के; गुजरात दुसरा, बिहार सर्वांत मागे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 11:54 pm
‘सेव्हिंग्ज’ करणाऱ्यांमध्ये गोवा देशात पहिल्या स्थानावर

पणजी : गोव्याचे उत्पन्न देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. गोव्याचे दरडोई उत्पन्नही देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. पैसे वाचवण्यातही गोवा पहिल्या स्थानावर आहे. पैसे बचतीचा दर गोव्यात सर्वाधिक ४९ टक्के आहे, तर देशाचा दर ३१ टक्के आहे. पैशांची बचत करण्यात गोमंतकीय इतर नागरिकांपेक्षा खूप पुढे आहेत.


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन शाखेने केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. संशोधनानंतर प्रत्येक राज्याच्या खर्चाचे प्रमाणही जाहीर करण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात हे प्रमाण वेगळे आहे.

बचतीचा विचार केला तर गोव्यात सर्वाधिक ४९ टक्के प्रमाण आहे. गोव्यापाठोपाठ गुजरात ४१ टक्के, हरियाणा ४० टक्के आणि कर्नाटक ३९ टक्के आहे. बिहारमध्ये सर्वांत कमी बचतीचे प्रमाण असून ते उणे ६ टक्के आहे. राष्ट्रीय बचत दर ३१ टक्के आहे. हे गुणोत्तर मासिक खर्च आणि प्रतिडोई उत्पन्नाच्या आधारे मोजले गेले, असे अहवालात म्हटले आहे.