वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन
पणजीः २०२५ च्या स्वागतासाठी देशविदेशातील पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राजधानी पणजीसह गोव्याच्या किनारी भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच वाहतूक कोंडी, अपघात यासारखे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस सतर्क असून पोलीस खात्यातर्फे रहिवासी आणि पर्यटकांना सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषत: कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूण, पणजी आणि मडगाव यांसारख्या भागात पर्यटकांच्या गर्दीमुळे तसेच उत्सव, कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित क्षेत्रात नियुक्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नववर्ष साजरे करताना मद्यपान करून गाडी चालवू नका असे आदेश वाहतूक खात्यातर्फे वाहनचालकांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांचे पथके जागोजागी तैनात असून मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर करडी नजर असणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
वाहतूक व्यवस्थेच्या सूचनांचे पालन करा!
जास्त रहदारी असलेल्या भागात तात्पुरती वाहतूक वळवली जाऊ शकते. कृपया ट्रॅफिक पोलिसांच्या निर्देशांचे आणि रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेच्या सूचनांचे पालन करावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक असून रस्त्यावरून चालताना तिहेरी चालणे टाळावे, अशा सूचना देखील वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.