मध्यम आकाराच्या नारळाची ४० रुपयांपेक्षा जास्त दराने विक्री
पणजी : रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या नारळाचे दर सध्या वाढले आहेत. सोमवारी पणजी बाजारात मध्यम आकाराचे ४० ते ४५ रुपये नग या दराने विकले जात होते.
बाजारात आवक कमी झाल्याने पुढील काही दिवस नारळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात काही भाज्यांच्या दरात किरकोळ घट झाली, तर काही भाज्यांचे दर वाढले.
बाजारात काकडीचे दर ३० रुपयांनी कमी होऊन ५० रुपये किलो झाले. मटारचे दर २० रुपयांनी कमी होऊन १०० रुपये किलो झाले, तर बीटाचे दर १० रुपयांनी कमी होऊन ५० रु. किलो झाले. लसूणाचे दर १०० रुपयांनी कमी होऊन ४०० रुपये किलो झाले.
गाजराचे दर २० रुपयांनी कमी होऊन ६० रुपये किलो झाले. बटाटा आणि टोमॅटोचे प्रत्येकी ४० किलो होते. कोबी ४० रुपये किलो तर फ्लॉवरचा एक गड्डा ४० रुपयांना होता.
पणजी बाजारात वांगी ६० रुपये किलो होती. मिरची, भेंडी, दोडकी, गवार प्रत्येकी ८० रुपये किलो होते.
कारल्याचे दर २० रुपयांनी कमी होऊन ६० रुपये किलो झाले. तर आल्याचे दर ४० रुपयांनी कमी होऊन १२० रुपये किलो झाले. वालपापडीचे दर २० रुपयांनी वाढून १६० रुपये झाले. ढब्बू मिरचीचे दर ३० रुपयांनी कमी होऊन ९० रुपये किलो झाले.
याशिवाय लिंबू ४ रुपयाला एक नग या दराने विकले जात होते.
मेथी २० रु., शेपू २० रु., पालक १० रु., कांदा पात १० रु., तर तांबडी भाजी १५ रु. , कोथिंबीर १५ रु.,तर पुदिन्याची एक जुडी १० रुपयांना होती. पणजी बाजारात सोमवारी अंडी ८५ ते ९० रुपये डझन या दराने विकली जात होती.
सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी ३५ रु. , कोबी २५ रु. ,गाजर ४७ रु., वालपापडी ७७ रु., मिरची ४५, कांदा ४० रु., बटाटा ३५ रु. तर टोमॅटो २३ रुपये किलो होता.
शेवगा पुन्हा दाखल
गेले काही आठवडे पणजी बाजारातून शेवग्याच्या शेंगा गायब झाल्या होत्या. पुरवठा कमी असल्याने शेवगा ६०० रुपये किलो पर्यंत गेला होता. सध्या बाजारात काही मोजक्याच ठिकाणी शेवगा २०० ते २२० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.