बेळगाव : स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची आईने केली हत्या!

शेतात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd January, 12:32 am
बेळगाव : स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाची आईने केली हत्या!

बेळगाव : स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाची मुलीच्या आईनेच निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील उमराणी येथे घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीमंत इटनाळ नामक व्यक्ती रोज दारू पिऊन पत्नी आणि मुलीला मारहाण करत होता. रात्री दारू पिऊन पुन्हा पत्नी आणि मुलीला मारहाण केली आणि स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने संतापलेल्या त्यांच्या पत्नी सावित्री यांनी पतीच्या डोक्यात दगड घालून ठार केले. 

घटना उघडकीस येऊ नये यासाठी सावित्री यांनी श्रीमंत यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह शेजारच्या शेतात नेऊन टाकला. गुन्ह्यासाठी वापरलेला दगड तिने आपल्या पतीच्या खोलीत लपवून ठेवला आणि खून झालेले ठिकाण स्वच्छ करून अंगावरील कपडे देखील जाळून टाकले. 

दरम्यान सकाळी मुलगी झोपेतून जागी झाल्यावर तिने तिला घडलेल्या प्रकाराबद्दल कुणालाही काहीही न सांगण्याचा इशारा केला. पण शेतात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. 

घडलेला प्रकार चिक्कोडी पोलिसांना समजल्यावर तपासादरम्यान त्यांना पत्नीवर संशय आल्याने सखोल चौकशीअंती पत्नी सावित्रीने पती करत असलेल्या अत्याचारासहित खूनाची घटना सांगितली. पोलिसांनी सावित्रीवर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.