पाच महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेणारी आई दोषी

बाल न्यायालयाचा आदेश : लाटणीच्या सहाय्याने रागाच्या भरात केला होता खून

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th January, 12:13 am
पाच महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेणारी आई दोषी

पणजी : बार्देश तालुक्यात स्वतःच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा लाटणीच्या सहाय्याने रागाच्या भरात आईने खून केला होता. बाल न्यायालयाने या प्रकरणी आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश बाल न्यायालय अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे.

कोलवाळ पोलिसांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, कपेलवाडा सिरसई येथील पाच महिन्याच्या चिमुकलीचे वडील सुदन गोंडलेकर यांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी उत्तररात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास मृत चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात बास्केटमध्ये घालून कोलवाळ पोलीस स्थानक गाठले होते. त्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी त्वरित चिमुकलीला म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलिसांनी खून प्रकरणी मृत चिमुकलीची आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस आणि वडील सुदन गोंडलेकर या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी करून १४ ऑगस्ट २०२२ रोजी त्या दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या ३०२ व गोवा बाल कायदा कलम ८ नुसार गुन्हा नोंद केला.

या प्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आईच्या विरोधात ३० साक्षीदारांची साक्ष नोंदवून २०० पानी आरोपपत्र म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण बाल न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील थेमा नार्वेकर हिने बाजू मांडून पुरावे सादर केले. त्यानंतर बाल न्यायालयाने चिमुकलीची आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला दोषी ठरविले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ रोजी होणार आहे.

आईने केला होता गुन्हा कबूल

या प्रकरणी त्या दोघांनी आपल्या जबाबात वारंवार बदल करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिने रागाच्या भरात मुलीला हातातील लाटणीने मारहाण केली होती. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी वडिलांना सोडले आणि आईला अटक केली होती.