दुचाकीस्वाराला मारहाणीसाठी दोघांवर, दुचाकीला रोखल्याप्रकरणी आठजणांविरोधात आरोपपत्र
मडगाव : सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत दि. ५ ऑक्टोबर रोजी मडगावात रास्ता रोको झाला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो, साविओ कुतिन्हो, फिडोल परेरा यांच्यासह १४१ जणांविरोधात आरोपपत्र सादर केले आहे. तर दुचाकीचालकाला मारहाणीच्या प्रकरणात दोघांवर तर दुचाकीला रोखणार्या आठ जणांविरोधात आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
मडगावात शनिवारी वेलिंगकर यांच्या अटकेसाठी निदर्शने करण्यात आली होती. वेलिंगकरांना अटक होत नसल्याने संतप्त आंदोलकांनी मडगावातील ओल्ड मार्केट जंक्शन, एसजीपीडीए मार्केट, केएफसी इमारत जंक्शन याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केली. याप्रकरणी अॅड. प्रतिमा कुतिन्हो, साविओ कुतिन्हो, फिडॉल परेरा, ज्योएल, साविओ डायस, जोयसी डायस, मेश्यू डिकॉस्टा, पीटर व्हिएगास, सबिता मास्कारेन्हस, फ्रँकी डिमेलो, कार्मिन, वॉरन, एव्हरसन वाझ, फ्रेडी ट्राव्हासो, पॉल फर्नांडिस, फ्रँकी गोम्स, क्लाइव्ह कार्दोज, नेव्हिल फर्नांडिस यांच्यासह पाचशे जणांवर बेकायदा जमाव करणे, सार्वजनिक रस्ते बंद करणे, सरकारी आदेशाचा अवमान करणे, मानवी सुरक्षितता धोक्यात येण्यासारखे कृत्य करणे, अडवणूक करणे, सरकारी कर्मचार्यांच्या कर्तव्यात बाधा आणत हल्ला करणे याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. चौकशीदरम्यान फातोर्डा पोलिसांकडून क्लाइव्ह कार्दोज, नेव्हिल फर्नांडिस यांना अटक करत त्याचदिवशी जामीन मंजूर झाला होता. याप्रकरणी आता फातोर्डा पोलिसांकडून १४१ जणांविरोधात आरोपपत्र तयार केले आहे.
फातोर्डा पोलिसांकडून आरोपपत्र दाखल
आंदोलनादरम्यान कदंब बसस्थानकानजीक दुचाकीचालक नियाज अहमद याची गाडी अडवून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित आगुस्तिन व दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीअंती फातोर्डा पोलिसांनी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केले.
ओल्ड मार्केट सर्कलनजीक शालेय मुलीला दुचाकीवरुन घेऊन जाणार्या वडिलांची अडवणूक करणार्या अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आता फातोर्डा पोलिसांनी चौकशीअंती आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
धमकीप्रकरणी मिकी पाशेकोंसह तिघांविरोधात आरोपपत्र
वेलिंगकर यांच्या अटकेसाठी मडगावात झालेल्या आंदोलनावेळी वेलिंगकर यांना गोळी घालण्याची भाषा करत धमकी देणार्या माजी मंत्री मिकी पाशेकोंविरोधात फातोर्डा पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी चौकशीअंती फातोर्डा पोलिसांकडून मिकी पाशेकोंसह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मडगावात दि. ५ ऑक्टोबर रोजी सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेसाठी शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला. राज्याच्या विविध भागातून मडगावात नागरिकांची गर्दी झालेली होती व वाहतूक बंद करण्यात आली होती. याप्रकरणी सुमारे ५०० जणांवर गुन्हेही दाखल केले होते. आंदोलनादरम्यान माजी मंत्री मिकी पाशेको यांनी सात ते आठजणांसह येत पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांच्याशी बोलताना सुभाष वेलिंगकर पोलिसांना मिळत नसतील तर ज्याठिकाणी मिळतील त्याठिकाणी डोक्यात गोळ्या घालू, अशी धमकीची भाषा केली होती. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला होता. याप्रकरणी नोटीस काढून मिकी पाशेको यांची चौकशीही करण्यात आली होती. आता फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी चौकशी पूर्ण करुन माजी मंत्री मिकी पाशेकोंसह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.