पणजी : गोव्यात अमली पदार्थाला चांगली मागणी आहे. तसेच त्याला बाजारभाव चांगला मिळेल, या आशेने कुल्लू - हिमाचल येथे शेती करून चरस गोव्यात आणलेल्या युवकाला मोरजी-पेडणे येथे गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) अटक केली. या प्रकरणी एएनसीने जवाहर सिंग जिबू (रा. कुल्लू-हिमाचल प्रदेश) या युवकाला अटक करून त्याच्याकडून ४.५ लाख रुपये किमतीचे ४५० ग्रॅम चरस जप्त केले.
मोरजी - पेडणे येथे हिमाचल प्रदेशमधील एक व्यक्ती चरस घेऊन येणार असल्याची माहिती एएनसीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, एएनसीचे अधीक्षक टिकम सिंह वर्मा आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, हवालदार सेड्रीक फर्नांडिस, कॉन्स्टेबल अमित साळुंखे, राहुल गावस, अक्षय नाईक, कुंदन पाटेकर, महिला कॉन्स्टेबल ज्योती नाईक व इतरांनी गुप्तहेरांनी दिलेल्या ठिकाणी सापळा रचला. पथकाने शनिवार, दि. ४ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री १०.४५ वाजता तिथे सापळा रचला असता, एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथकाच्या नजरेस आले. पथकाने त्याची चौकशी केली असता, तो जवाहर सिंग जिबू असल्याचे समोर आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४.५ लाख रुपये किमतीचा ४५० ग्रॅम चरस सापडला. त्याची प्राथमिक चौकशी केली असता, त्याने स्वतः या चरसचे उत्पादन घेतल्याची माहिती समोर आली. गोव्यात अमली पदार्थाला चांगली मागणी आणि बाजारभाव असल्यामुळे तो चरस विक्रीसाठी गोव्यात आला होता. पथकाने त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली. संशयित जवाहर सिंग जिबूला रविवारी पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.