पणजीत गांजाच्या रोपामुळे उडाली खळबळ

एएनसीच्या अधिकाऱ्यांनी रोप केले जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 12:02 am
पणजीत गांजाच्या रोपामुळे उडाली खळबळ

पणजी : पोलिसांनी गांजा पकडणे हे नवीन नाही. पण, चक्क पणजीत गांजाचे रोप आढळून आले. सांतइनेज काकुलो मॉलजवळ गांजाचे रोप दिसले. लोकांच्या लक्षात येताच, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एएनसी) अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ते रोप काढून तपासासाठी पाठवले. हे रोप कोणी लावले, कसे आले हे एक गूढ बनून आहे.

काकुलो मॉलजवळील पदपथावर लावलेल्या झाडांमध्ये गांजाचे रोपे उगवले होते. सुमारे एक फूट उंचीचे हे झाड होते. दुपारी रोपांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पणजी स्मार्ट सिटीतील हे रोप खरोखरच गांजाचे आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. हे प्रकरण एएनसीच्या कानावर गेल्यावर एएनसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रोप जप्त केले. एएनसीने हे रोप जप्त केले आणि पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविल्याचे एएनसीचे पोलीस निरीक्षक संजीत पिल्ले यांनी सांगितले.