मुंबईतील पर्यटकांवर हल्ला प्रकरणी संशयितांना ५ दिवस पोलीस कोठडी

कळंगुटमध्ये शॅकवाल्यांकडून झाली होती मारहाण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th January, 11:48 pm
मुंबईतील पर्यटकांवर हल्ला प्रकरणी संशयितांना ५ दिवस पोलीस कोठडी

म्हापसा : जीवरक्षक बसण्याची खुर्ची पाडल्याच्या क्षुल्लक कारणावरून कळंगुट समुद्रकिनारी ठाणे मुंबईतील पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या प्लॅनेट गोवा बीच शॅकच्या सहाही कर्मचार्‍यांना म्हापसा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी शनिवार, दि. ४ रोजी संशयित आरोपी नौफल आबूबेकर पी. टी. (२८, रा. केरळ), मयुरेश हरीश सौदागर (३४, रा. कोटकरवाडा पेडणे) हे दोघे सुरक्षारक्षक तर मूळ हिमाचल प्रदेशमधील रोहीत मानसिंग कुमार (२७), अभिषेक रानोराम कुमार (२४), विनोद तर्दूराम कुमार (३१) व सुरिंदर करनैल सिंग कुमार (२८) यांना म्हापसा प्रथम न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दरम्यान, ही घटना शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. फिर्यादी नितीन अगरवाल यांच्यासह त्याच्या पाच मित्रांवर खुनी हल्ला करण्यात आला होता. यात रोहीत दरोलिया (४०, रा. मुंबई) याच्या डोक्यावर दंडुका घातल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर हे सर्व पर्यटक मुंबईला रवाना झाले.

मुंबईतील पर्यटक मौजमजा करताना घटनास्थळी समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षकांना टेहळणी करण्यासाठी ठेवलेली खुर्ची कोसळली. हा प्रकार गोवा प्लॅनेट बीच शॅकच्या संशयित सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. नंतर त्याने या पर्यटक गटाला जाब विचारला. नंतर शॅकमधून आपल्या सहकार्‍यांना बोलावून त्याने पर्यटकांवर हल्ला चढवला व त्यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी भा.न्या.सं.च्या १९१(२)(३), १९१, ११५ (२) १०९ व १९० कलमान्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून वरील संशयितांना अटक केली होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर करीत आहेत.

प्लॅनेट गोवा शॅकच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण

लुईझा आलेक्स कुतिन्हो यांच्या मालकीच्या प्लॅनेट गोवा शॅकच्या समोर मुंबईतील हा सहा जणांचा गट वाळूमध्ये आपापसात मौजमस्ती करत होता. त्यावेळी शॅक बंद होते. मौजमजा करताना घटनास्थळी समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षकांना टेहळणी करण्यासाठी ठेवलेली खुर्ची कोसळली. नंतर शॅकच्या सुरक्षारक्षक व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली होती.