कळंगुट बोट दुर्घटना : दोघा बोट ऑपरेटरांनाही सशर्त जामीन
पणजी : कळंगुट समुद्रात जलसफरी दरम्यान बोट बुडून पर्यटकाच्या मृत्यू प्रकरणात बोटची मालक मीना कुतिन्हो हिला पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ५० हजार व इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच अटक करण्यात आलेल्या बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली आणि इब्राहीम शरीफ साब या दोघांना प्रत्येकी २५ हजार रुपये व इतर अटींवर जामीन मंजूर केला आहे.
खेड-महाराष्ट्रातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटुंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टीनिमित्त आले होते. बुधवार, २५ रोजी त्यांनी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर बोटीतून जलसफरीचा आनंद घेण्यासाठी जाॅन वाॅटर स्पोर्ट्सची बोट घेतली होती. त्यावेळी वरील १३ जणांसह आणखी पर्यटकांना बोटीत भरले. बोट समुद्रात शंभर मीटर अंतरावर गेल्यानंतर बोटचे इंजिन वाळूत रूतून बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. या दुर्घटनेत सूर्यकांत पोफळकर यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या मुलासह पाच जणांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले.
या प्रकरणी पणजी किनारी पोलिसांनी बोट मालक मीना कुतिन्हो हिच्यासह धारेप्पा झिराली आणि इब्राहीम शरीफ साब या दोघा ऑपरेटरांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही बोट आॅपरेटरना अटक केली. बोट आॅपरेटरना पणजी येथील पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, त्या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तसेच बोट मालक मीना कुतिन्होने हिने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने मीना कुतिन्हो हिला ५० हजार व इतर अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर, अटक करण्यात आलेल्या दोघा आॅपरेटरना प्रत्येकी २५ हजार रुपये व इतर अटींवर जामीन मंजूर केला.
बोटीत क्षमतेपेक्षा जास्त होते पर्यटक
बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली आणि इब्राहीम शरीफ साब यांनी वरील १३ जणांसह आणखी पर्यटकांना बोटीत भरले. बोटीची क्षमता कमी असतानाही आॅपरेटरने बोटीत १८ ते २० पर्यटकांना घेतले. बोट समुद्रात शंभर मीटर अंतरावर गेल्यानंतर बोटचे इंजिन वाळूत रूतून बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली होती.