बेळगाव येथे घाटमाथ्यावरील गावकर एकवटले

हळदोणा कोमुनिदाद निवडणूक : जमिनीचे जतन करणाऱ्यास पाठिंबा व्यक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 12:23 am
बेळगाव येथे घाटमाथ्यावरील गावकर एकवटले

बेळगाव : हळदोणा कोमुनिदादच्या सन २०२५-२८ च्या नवीन समितीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी घाट क्षेत्रातील गावकर मोठ्या संख्येने गोव्यात येणार आहेत. कोमुनिनाद फॅटर्नल दी हळदोणाचे घटक असलेल्या यातील अनेक गावकरांनी विकासकामांना पाठिंबा देतानाच कोमुनिदादची मालमत्ता जतन करणाऱ्या संघाला पाठिंबा देण्याचा संकल्प केला आहे. नवीन समितीसाठी रविवारी निवडणूक होत आहे.

घाटमाथ्यावरील या गावकरांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आणि मालमत्ता गमावल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते गोव्यात येतात तेव्हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी योग्य निवासस्थानाची मागणी करत आहेत.

अनेकांना एक पारदर्शक आणि भ्रष्टाचारविरहित समिती हवी आहे. या समितीने कोमुनिदाद मालमत्तेचे रक्षण करणे गरजेचे आहे. रविवारी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते उत्सुक आहेत.

मी घाट क्षेत्रात स्थायिक आहे. गेल्या निवडणुकीत माझी कोमुनिदादच्या खजिनदारपदी निवड झाली. कोमुनिदाद कार्यालयात थेट प्रवेश मिळू शकल्याने घाटमाथ्यावरील गावकरांनी समाधान व्यक्त केले आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, बेळगाव आणि खानापूर तालुक्यात गोव्यातील अनेकजण राहतात, असे गॅब्रिएल डिसोझा यांनी सांगितले. 

गोव्यातील आमच्या वडिलोपार्जित मालमत्ता ज्या बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्या जात आहेत किंवा भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत, त्या सुरक्षित ठेवण्याबाबत आम्ही चिंतित आहोत. याबाबत आम्ही आमच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. कोमुनिनाद फॅटर्नल दी हळदोणाचे किमान १५० जण नवीन समितीसाठी मतदान करण्यासाठी रविवारी गोव्यात येतील, असे पुणे येथील इलियास बार्देसकर यांनी सांगितले.