फोंडा वाहतूक पोलिसांकडून वर्षभरात ३६,४८१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई

२.१८ कोटींचा दंड : फोंडा, धारबांदोडा तालुक्यात ३२ अपघाती मृत्यूची नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 12:18 am
फोंडा वाहतूक पोलिसांकडून वर्षभरात ३६,४८१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई

फोंडा : येथील वाहतूक पोलिसांनी २०२४ मध्ये नियमभंग करणाऱ्या एकूण ३६,४८१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून २ कोटी १८ लाख ६९ हजार ५०० रुपये सरकारी तिजोरीत जमा केले. २०२३ वर्षात वाहतूक पोलिसांनी ४५,९४८ वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करून २ कोटी ७० लाख रुपये तिजोरीत जमा केले होते. मावळत्या २०२४ साली फोंडा व धारबांदोडा तालुक्यात एकूण ३२ अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे.

फोंडा वाहतूक पोलिसांनी २०२४ मध्ये वेगाने वाहन चालविणाऱ्या ३,३६९ तर २०२३ साली ३२६५, दारुच्या नशेत ३७३ तर २०२३ साली २०१, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या १३८ तर २०२३ साली ९२, विनाहेल्मेट २,२४७ तर २०२३ साली २,५१७, धोकादायक पार्किंग ३,९११ तर २०२३ साली ६,५००, विना सीटबेल्ट ४०५ तर २०२३ साली २९१, नो एन्ट्री ५,६१४ तर २०२३ साली ७,२१३, फिल्मींग २,९१७ तर २०२३ साली ४,७३३ व अन्य नियमभंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय २०२४ साली फोंडा वाहतूक पोलिसांनी निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी २६२ विविध हायस्कूलमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती केली. त्याशिवाय ४,५५२ वाहनचालक, ३,०६३ विद्यार्थी, ४१५ ज्येष्ठ नागरिक, ४४१ शिक्षक, ४२० कामगार व अन्य जणांमध्ये जागृती केली. वर्षभरात ४,१८२ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्यात पाठविण्यात आले आहे.


वाहतूक नियमांचे पालन करा : सिनारी

फोंडा वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी सन २०२४ मध्ये दारुच्या नशेत असणाऱ्या ३७३ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. त्यापैकी एका वाहनचालकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. वेगाने वाहने चालविणे तसेच अन्य वाहतूक नियमांचा भंग केल्याने अपघाताला आमंत्रण मिळत असते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहने चालविताना वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.