या वर्षी प्रकाशझोतात येतील असे नवे चेहरे

Story: टॉप १० । हर्षदा वेदपाठक |
03rd January, 12:20 am
या वर्षी प्रकाशझोतात येतील असे नवे चेहरे

२०२४ मध्ये असे अनेक नवे चेहरे पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आले ज्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कुटुंबांशी कोणताही संबंध नव्हता. चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत घराण्यातील मुलांच्या चित्रपटांना फार पसंती न देणारे प्रेक्षक थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’ चित्रपटातील आमिर खानचा मुलगा जुनैदच्या अभिनयाने विशेष प्रभावित झाले. मात्र जुनैदची खरी कसोटी या नव्या वर्षात लागणार आहे. २०२४ मध्ये प्रेक्षकांसमोर आलेल्या त्या नव्या चेहऱ्यांविषयी ज्यांंनी प्रेक्षकांना प्रभावित केले...


लक्ष्य लालवानी (किल)

टीव्हीच्या बागेतून उगवलेले आणि हिंदी चित्रपटसृष्टीला सुगंधित करणारे फूल म्हणजे अभिनेता लक्ष्य लालवानी. दिल्लीकर असलेला लक्ष्य लालवानी हा छोट्या पडद्यावर एक नावाजलेला अभिनेता आहे. दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांच्या ‘किल’ या चित्रपटातून त्याचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. यात बिभत्स, रौद्र आणि भयानक या तिन्ही रसांमध्ये लक्ष्यने अप्रतिम अभिनय केला आहे.


जुनैद खान (महाराज)

यावर्षी आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने ‘महाराज’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कथा अतिशय संवेदनशील विषयावर आधारित असून त्यावरून बरेच वादही झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार हा चित्रपट प्रदर्शित झाला असून जुनैदने स्वतंत्र पत्रकाराच्या भूमिकेत कौतुकास्पद काम केले आहे.


हार्दिक सोनी (औरों में कहां दम था)

‘औरों में कहां दम था’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पदार्पण करणाऱ्या हार्दिक सोनीची प्रेक्षकांंनी प्रशंसा केली. अजय देवगण सारख्या दमदार अभिनेत्यासमोरही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या हार्दिकने पक्याच्या भूमिकेत अक्षरश: प्राण ओतले. त्याच्या या अभिनयाची खूप चर्चा झाली.


स्पर्श श्रीवास्तव (लापता लेडिज)

‘बालिका वधू’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘चक धूम धूम’ या डान्स रिअॅलिटी शोचा विजेता स्पर्श श्रीवास्तव याच्या ‘जमतारा’ या मालिकेतील अभिनयाचेही कौतुक झाले आहे. ‘कॉलर बम’ हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट होता जो थेट ओटीटी वर प्रदर्शित झाला. ‘लपता लेडीज’ या चित्रपटातून त्याचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले.


पश्मीना रोशन (इश्क विश्क रिबाउंड)

२०२४ साली मोठ्या पडद्यावर दिसलेल्या नवीन चेहऱ्यांपैकी रोशन कुटुंबाची मुलगी पश्मीना हिचा ‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना खूप भावला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नसली तरी पश्मीनाच्या आत्मविश्वासाचे आणि तिच्या अभिनय क्षमतांचे प्रेक्षकांनी कौतुक केले.


ऋषभ साहनी (फायटर)

‘फायटर’ हा चित्रपट २०२४ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट होता. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. ऋषभ साहनीने या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका अझहर अख्तर या व्यक्तिरेखेची असून हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे बोलले जात आहे. 


जानकी बोदीवाला (शैतान)

जानकी बोदीवालाने ‘शैतान’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ज्या गुजराती चित्रपटाचा ‘शैतान’ हा रिमेक आहे, त्यात जानकीने तीच भूमिका केली होती, जी तिने हिंदीतील ‘शैतान’ चित्रपटात साकारली होती. या चित्रपटातील जानकीच्या भूमिकेचे कौतुकही झाले. या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु पहिल्या चित्रपटाचा व्यवसाय पाहता त्याचा सिक्वेल बनण्याची शक्यता कमी आहे.


प्रतिभा रांटा (लापता लेडीज)

आमिर खान प्रॉडक्शनच्या  ‘लपता लेडीज’ या चित्रपटातून तीन कलाकारांनी मोठ्या पडद्यावर एकत्र पदार्पण केले. यातील प्रतिभा रांटा हिने ‘कुर्बान हुआ’ आणि ‘आधा इश्क’ नावाच्या मालिकांमध्ये काम केले आहे. मूळच्या सिमला, हिमाचल प्रदेशच्या असणाऱ्या प्रतिभा रांटा हिला ‘लापता लेडीज’ या सिनेमातून अभिनयाची चांगली संधी मिळाली.


जिब्रान खान (इश्क विश्क रिबाउंड)

‘इश्क विश्क रिबाउंड’ मधून पदार्पण केलेल्या जिब्रान खानच​​ी चर्चा या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच सुरू झाली होती. कारण त्याने त्याआधी ‘कभी खुशी कभी गम’, ‘रिश्ते’ आणि ‘क्यूंकी मै झुठ नहीं बोलता’ चित्रपटांत बाल कलाकार म्हणून काम केले होते.


कीर्ति सुरेश (बेबी जॉन)

दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध नायिका कीर्ती सुरेशने २०२४ साली ‘बेबी जॉन’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये, सगळ्याच मोठ्या कलाकारांबरोबर तिने काम केले आहे. तिचे सगळेच चित्रपट यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे अभिनय, प्रसिद्धी, पुरस्कार हे तिला नवीन नाही. असे असूनही, कीर्ती सुरेश तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाने लोकांच्या नजरेत भरली.

२०२४ मध्ये चमकलेल्या या सगळ्याच कलाकारांमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता आहे. परंतु जे सीनियर, नामचीन कलाकार आहेत ते जेथे ओटीटीवर काम करताना दिसत आहेत, तेथे या नावकलाकारांना ओटीटी म्हणा किंवा मोठ्या पडद्यावर कितपत वाव मिळेल ते काळच ठरवेल. परंतु प्रेक्षक हा चाणाक्ष आहे, स्टार किड असो की नवीन कलाकार जो फक्त कथा आवडली तरच चित्रपट बघायला जातो. दमदार अभिनय करून प्रेक्षकांना खेळवून ठेवायची क्षमता ज्याच्यामध्ये असेल तोच येथे टिकेल हे तितकच सत्य आहे. पाहूया नवीन वर्षात हे सगळे कलाकार काय कामगिरी दाखवतात ते !!!

हेही वाचा