फोंडा : नाणूस- उसगाव येथे रानटी जनावरांसाठी लावलेल्या फासात अडकून बिबट्या ठार

वन खात्याकडून चौकशी सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd January, 12:17 pm
फोंडा : नाणूस- उसगाव येथे रानटी जनावरांसाठी लावलेल्या फासात अडकून बिबट्या ठार

फोंडा : नाणूस-उसगाव भागात रानटी जनावरांचा उपद्रव गेल्या काही काळापासून वाढला आहे. त्याचा फटका येथे वायंगण पद्धतीची शेती करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना नेहमीच होतो. येथे जवळच असलेल्या रानातून अनेक रानटी जनावरे अन्नपाण्याच्या शोधात भटकत या वायंगणात येतात व येथील तयार पिकाचा फडशा पाडतात. याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसतो. रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात अडकून बुधवारी रात्री एका बिबट्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर मृत बिबट्याची डॉक्टरकडून उत्तरीय तपासणी करण्यात आली. सध्या वन खात्याकडून नाणूस-उसगाव चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

फोंडा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच तज्ञ डॉक्टरना पाचारण करून मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वन अधिकारी येथील बागायतीच्या मालकाची अधिक चौकशी करीत आहे. दरम्यान येथील काही जणांनी शेती व बागायतीची हानी रोखण्यासाठी उपाय म्हणून गावठी बॉम्ब आणि फास वापरण्याचा पर्याय अवलंबला आहे.  काहीजण रात्री मध्यरात्री शिकारीसाठी देखील बाहेर पडतात. दरम्यान रानटी जनावारांसाठी लावलेल्या एका फासात हा बिबट्या सापडून त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. ज्या ठिकाणी हा मृत बिबट्या आढळला ते ठिकाण मुख्य रानापासून सुमारे १.५ किमी दूर आहे. गेल्यावर्षी देखील उसगाव येथेच रस्त्याच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. या बिबट्याची नखे कापलेली आढळली होती. 

सत्तरी-फोंडाच्या अंतर्गत भागात शिकारीसाठी जाणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोक खास करून बेतोडा, वाघूर्मे, उसगाव, केरी व शिरोडासह अन्य भागात रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी येतात. वन खात्याने रानातील जनावरची शिकार करण्याऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. मागेच पाटवळ-वाळपई, सत्तरी  येथील एका घटनेत शिकारीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांकडून आतापर्यंत मिळवलेल्या माहितीनुसार, चिंचमळ भागामध्ये अनेक जण बेकायदेशीरपणे बंदूक वापरत आहेत. या भागात गव्यांची शिकारदेखील यापूर्वी करण्यात आली आहे. हे मांस अनेक हॉटेल्स व आस्थापनांमध्ये पोहोचलेले आहे. याची पोलीस चौकशी करीत आहेत. तसेच या भागांमध्ये आक्षेपार्ह वस्तू असल्याचा पोलिसांना सुगावा लागल्यानेच शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच तुकड्या तयार केल्या आहेत.

हेही वाचा