२०२४ मध्ये राज्यात ८७.९८ टक्के गुन्ह्यांचा छडा तर ९.८१ कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त

२०२४ या सरत्या वर्षाला निरोप देताना पोलीस खात्याने केलेल्या कामगिरीवर एक नजर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
31st December 2024, 04:57 pm
२०२४ मध्ये राज्यात ८७.९८ टक्के गुन्ह्यांचा छडा तर ९.८१ कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त

पणजी : राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतेही गुन्हेगारी कृत्य घडू नये यासाठी पोलीस पथक नेहमी क्रियाशील असते. २०२४ या सरत्या वर्षाला निरोप देताना पोलीस खात्याने केलेल्या कामगिरीवर संक्षिप्त स्वरुपात नजर टाकण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

या संदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार  २०२४ मध्ये ८७.९८ टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. २०९६ गुन्ह्यांपैकी ८७.९८ टक्के म्हणजेच १८४४ गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला असून यात २९ खून, १०० बलात्कार, १६ दरोडा-चोरी, २९ खूनी हल्ले या प्रमुख गुन्ह्यांचा समावेश आहे.

९.८१ कोटी रुपये किमतीचा अमलीपदार्थ जप्त-

गुन्हेगारी शिवाय अमली पदार्थांची होणारी तस्करी हा विषय राज्याच्या अस्मितेला गालबोट लावणारा ठरत आहे. या विरोधातही पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असून २०२४ मध्ये २७४ किलो ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे.

२०२४ मध्ये अमली पदार्थ तस्करी व सेवन प्रकरणी राज्यभरात १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. यात १८८ जणांना अटक करण्यात आली असून तब्बल ९.८१ कोटी रुपये किमतीचा २७४ किलो ग्रॅम अमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

३.३ लाख वाहनचालकांवर कारवाई -

वाढत्या शहरीकरणामुळे वाहनचालकांच्या संख्येतही वाढ होत असून वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बहुतांशी अपघात घडत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस सक्षमपणे काम करत असून सिग्नल तसेच रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्ही द्वारा बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवली जाते. तसेच महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेकडून स्पीड गनचा अवलंब केला जातो. 

२०२४ मध्ये वाहन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३.३ लाख वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. याद्वारे २०.५३ कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून ३२ हजार ५३६ जणांचे वाहन परवाने निलंबित करण्याची वाहतूक खात्याकडे शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा