उपाध्यक्षपदी रुपेश ठाणेकर यांची निवड
मडगाव : कोकणी भाषा मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी रत्नमाला दिवकर यांची, तर उपाध्यक्षपदी रुपेश ठाणेकर यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्षा अन्वेशा सिंगबाळ यांनी वैयक्तिक कारणावरून पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.
रत्नमाला दिवकर यांनी आकस्मिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्याने समितीने त्यांची एकमताने निवड केली. त्यांनी विशेष लक्ष घालून बंदिस्त चित्रांगी मेळा आयोजित केला होता. रत्नमाला दिवकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपदाची रिक्त जागा भरण्यासाठी रुपेश ठाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नमाला दिवकर, या वर्षी शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्या माजी विद्यार्थी चळवळीच्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी बाल साहित्याची अनेक पुस्तके आणि गीते प्रकाशित केली आहेत. त्यांना गोवा कोकणी अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रत्नमाला दिवकर यांनी शिक्षण आणि बालसाहित्य या दुर्लक्षित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून मंडळाच्या इतर उपक्रमांना गती देण्याचे ठरवले आहे. बंद पडलेल्या गोवा युवा महोत्सवाचे पुनरुज्जीवन करण्यावरही त्यांचा भर असेल. उद्योजक दत्ता दामोदर नाईक यांनी मंडळाला एक कोटी रुपयांची देणगी देण्याची तयारी दर्शविल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
गोवा युवा महोत्सवामधून आपली जडणघडण झाल्याचे स्वत: रुपेश ठाणेकर मान्य करतात. ते सध्या विजयानंद ज्ञानप्रसारक संस्था, मये आणि डिचोली कोकणी केंद्राचे अध्यक्ष आहेत असे सचिव मंगलदास भट यांनी सांगितले.