मडगाव न्यू मार्केटमधली दोन दुकाने फोडली; वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण

पोलीस गस्त असताना देखील चोऱ्या होत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
31st December 2024, 03:30 pm
मडगाव न्यू मार्केटमधली दोन दुकाने फोडली; वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण

मडगाव :  मडगाव न्यू मार्केटमधील दुकानांच्या चोरीच्या प्रकारानंतर पुन्हा एकदा आके मडगावातील दोन दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून पद्मा फार्मसी व रेड कार्पेट रेस्टॉरंटमध्ये चोरी झाली. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मडगावात चोरट्यांचा धुमाकूळ वाढत असून दोन दिवसांपूर्वी मडगाव पालिकेच्या न्यू मार्केटमध्ये सुमारे आठ दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते.

आता सोमवारी रात्री पुन्हा एकदा आके मडगाव परिसरात चोरी करण्याच्या घटनेने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असतानाही चोरीच्या घटना घडत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आकेतील पद्मा फार्मसी व रेड कार्पेट रेस्टॉरंटमध्ये चोरी झाल्याची घटना उघड झाली. चोरट्यांनी पद्मा फार्मसीचे शटरची कडी तोडून आत प्रवेश केला. फार्मसीमध्ये जास्त पैसे ठेवण्यात आले नव्हते त्यामुळे चोरट्यांच्या हाती केवळ पाचशे रुपये लागले. तर रेड कार्पेट रेस्टॉरंट मधील एक मोबाईल व काही पैसे चोरट्यांनी पळवले. फार्मसीमधील सीसीटीव्हीमध्ये चोर दिसत असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, हाताचे ठसे याद्वारे तपास सुरू आहे.

मडगावातील चोरीच्या घटना वाढलेल्या असून पोलीस गस्त घालण्यात येत असतानाही रस्त्यालगतची दुकाने फोडली जात असल्याने पोलीस बंदोबस्ताबाबत व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा