३० डिसेंबरपर्यंत ८,६३१ कॉल्स : सर्वाधिक ९५८ कॉल म्हापसा केंद्रात
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यावर्षी मान्सून आणि मान्सूनोत्तर पावसाने राज्यात कहर केला होता. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. घरांवर, दुकानांवर झाडे पडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे यंदा अग्निशामक दलाला आलेल्या एकूण कॉलपैकी सर्वाधिक ४८.६० टक्के कॉल हे वातावरणीय आपत्तीसाठी आले होते. यामध्ये पाऊस, पूर, दरड, झाड कोसळणे यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाला १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान एकूण ८,६३१ कॉल आले. यापैकी ४,१९५ कॉल हे पाऊस, पूर किंवा हवामान विषयक अन्य आपत्तीविषयी होते. दलाला आगीसंबंधी २,५२३ (२९.२३ टक्के) तर अन्य आपत्कालीन परिस्थितीचे १,९१३ (२२.१६ टक्के) कॉल आले.
सर्वाधिक ९५८ कॉल म्हापसा केंद्रात आले. यानंतर डिचोलीत ८६२, फोंड्यात ८२३, वाळपईत ६६३, तर मडगाव केंद्रात ७६५ कॉल्स आले. या कालावधीत विविध आपत्कालीन घटनेत सुमारे ७.६१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. आगीच्या व अन्य आपत्कालीन घटनांत ११४ व्यक्ती आणि ६० जनावरांचा मृत्य झाला.
दुपटीहून अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश
दलाला गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीहून अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. दलाने यंदा ४३८ जणांना वाचवले. मागील वर्षी दलाने १९० जणांना वाचवले होते. याशिवाय दलाला यंदा ७६२ जनावरांना वाचविण्यात यश आले आहे. खात्याने या वर्षात सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली आहे.
गवताला लागलेल्या आगीबाबत १,२१४ कॉल
यंदा अग्निशामक दलाला आगीसबंधी आलेल्या एकूण २,५२३ पैकी १,२१४ कॉल वाळलेल्या गवताला लागलेल्या आगीबाबत होते. १९० कॉल जंगल भागात लागलेल्या आगीबाबत होते. याशिवाय अन्य आपत्ती विभागात आलेल्या १,९१३ पैकी ८१३ हे प्राण्यांना वाचवण्याशी संबंधित होते.