पणजी : गेले काही दिवस राज्यात उष्णता वाढली असली तरी थंडी देखील वाढत आहे. शुक्रवारी पणजीत किमान २०.५ अंश तर मुरगावमध्ये २०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार म्हापसा येथे १८ तर साळगाव येथे १९.२ अंश किमान तापमान राहिले. पुढील काही दिवस पारा १९ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
शुक्रवारी पणजी येथे कमाल ३२.२ तर मुरगावमध्ये ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. राज्यात ४ ते ९ जानेवारी दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. ४ ते ६ जानेवारी दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ५५ किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.