भेटीमागचे गूढ वाढले : तानावडेंसह दोन मंत्री, एक आमदार बंगल्यावर पोहोचल्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा
पणजी : गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या चर्चेला ऊत आलेला असतानाच, बुधवारी आल्तिनो येथील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ‘महालक्ष्मी’ या सरकारी बंगल्यावर अचानक बैठकांचा धडका सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा बुधवारी दिवसभर झडत राहिल्या. या बैठका संघटनात्मक निवडणुकांच्या अनुषंगाने झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर यांनी बुधवारी सकाळी बंगल्यावर हजेरी लावली. त्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर आणि आमदार प्रवीण आर्लेकरही बंगल्यावर पोहोचले. त्यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासह दोन मंत्री आणि एक आमदार अचानक बंगल्यावर दाखल झाल्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बैठका घेतल्या असाव्या, असा संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त केला गेला. परंतु, तानावडे यांच्यासह विनय तेंडुलकर, मंत्री हळर्णकर यांनी फेरबदलाबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा
- प्रदेश भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जानेवारीमध्ये मंडळ आणि जिल्हा अध्यक्षपदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होणार आहे.
- यावेळच्या मंडळ आणि जिल्हा अध्यक्षपदासाठी भाजपने वयाची अट घातली आहे. मंडळ अध्यक्षासाठी कमाल वय ४५ आणि जिल्हा अध्यक्षपदासाठी ६० वर्षे वय निश्चित करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे अनेकांची संधी हुकणार असल्याने त्यांच्याकडून ही अट रद्द करण्याची मागणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
- काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेल्या आमदारांनी आपापल्या मर्जीतील व्यक्तींची मंडळ अध्यक्षपदी नेमणूक व्हावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेही पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरलेली आहे. त्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय नाही
- प्रदेश भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याअनुषंगाने बुधवारी काही बैठका घेण्यात आल्या. त्यात मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कोणताही विषय नव्हता. मंत्री सुदिन ढवळीकर यांचा पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्याशी बैठक घेऊन आपण याच विषयावर चर्चा केली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
- पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत आज पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा झाली शिवाय मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्या सोबत युती व आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. नवीन वर्षांत अनेक नव्या गोष्टींही लवकरच होतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नवीन वर्षात मंत्रिमंडळ फेरबदल शक्य : तानावडे
पणजी : नवीन वर्षात मंत्रिमंडळात बदल झालेला पहायला मिळेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संघटनात्मक निवडणुकीविषयी माझी चर्चा झाली, अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासह माजी खासदार विनय तेंडुलकर व अॅड. नरेंद्र सावईकर यांनी आल्तिनो बंगल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संघटनांतर्गत निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे सांगतानाच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत तानावडे यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले. माजी खासदार विनय तेंडुलकर आणि अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सदिच्छा भेट असल्याचे सांगतानाच चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला. मंत्र्यांसह भाजपच्या तीन नेत्यांनी एकाचवेळी भेट घेतल्याने भेटी मागचे गूढ वाढले आहे.
नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अन्य कोणताही विषय नव्हता. इतर विषयावर चर्चा झाली तरी सर्व काही सांगता येणार नाही, असे तेंडुलकर यांनी सांगितले. माजी खासदार अॅड. सावईकर यांनीही सदिच्छा भेट असल्याचे सांगताना तपशील उघड करण्यास नकार दिला.
१० जानेवारीपूर्वी मंडळ अध्यक्षांची निवडणूक होणे आवश्यक आहे. येत्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात या भेटीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संघटनांतर्गत निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. - सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सहा नावे श्रेष्ठींकडे पाठवण्याचा निर्णय
पणजी : प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रदेश भाजपकडून माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे आणि दामू नाईक या सहा जणांची नावे श्रेष्ठींकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवड येत्या फेब्रुवारीमध्ये बिनविरोध होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गोव्यासह देशभरातील विविध राज्यांमध्ये भाजपने संघटनात्मक निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात बूथ, मतदारसंघ, जिल्हा पातळीवरील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पदासाठी भाजपने सुरुवातीला अॅड. नरेंद्र सावईकर, दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, दयानंद सोपटे, दामू नाईक यांच्यासह ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपईकर आणि माजी मुख्य माहिती आयुक्त विश्वास सतरकर यांच्याही नावांचा विचार चालवला होता. परंतु, अंतिम क्षणी सावईकर, मांद्रेकर, परुळेकर, सोपटे, कवळेकर आणि दामू नाईक या सहा जणांची नावे श्रेष्ठींकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवेळीप्रमाणे यावेळीही भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड बिनविरोध होणार असल्याने फेब्रुवारीमध्ये या सहापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कार्यकाळ संपूनही तानावडेच प्रदेशाध्यक्षपदी
विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा कार्यकाळ गतवर्षीच संपुष्टात आला. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, त्यानंतरच्या काळात लोकसभा तसेच विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्यामुळे पक्षाने गोव्यासह इतर काही राज्यांतील पक्षांतर्गत निवडणुका स्थगित ठेवत प्रदेशाध्यक्षांना मुदतवाढ दिली होती. सदानंद शेट तानावडे अद्यापही प्रदेशाध्यक्षपदी कायम आहेत.