म्हापशातील भावजय-दीराचा मृत्यू : कार चालकास अटक
म्हापसा : पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी गेलेल्या शेळपे-म्हापसा येथील भावजय-दिराचा अपघातात मृत्यू झाला. आशीर्वाद नागेश गोवेकर (४२) व रेश्मा रमेश गोवेकर (६५) अशी या भावजय-दिराची नावे आहेत.
हा अपघात गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहाजवळील मुख्य रस्त्यावर घडला. आशीर्वाद हा स्कूटर घेऊन मुख्य रस्त्यावर येत होता. स्कूटरच्या मागे रेश्मा या बसल्या होत्या.
रस्त्यावर स्कूटर घेताच एका भरधाव आलिशान कारने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात स्कूटरस्वार आशीर्वाद हा जागीच ठार झाला. तर जखमी रेश्मा गोवेकर यांचा इस्पितळात उपचारादरम्यान काहीवेळाने मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पुणे विमानतळ पोलीस स्थानकाचे सहाय्यक निरीक्षक पोटे यांनीसहकारी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. तसेच अपघातास कारणीभूत कार चालकाला ताब्यात घेतले व रात्री त्यास रितसर अटक केली.
रेश्मा यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन
आशीर्वाद व रेश्मा ही भावजय-दीर मूळ कारवार कर्नाटकचे असून आशियाना बिल्डींग शेळपे म्हापसा येथ वास्तव्यास होते. रेश्मा यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यांना दोन मुली असून त्यातील एक विवाहित आहे. तर आशीर्वाद हा देखील विवाहीत होता. त्यांचे नातेवाईक पुण्याला राहतात. त्यामुळे भावजयीला घेऊन आशीर्वाद हा वैद्यकिय उपचाराच्या निमित्ताने पुणे येथे गेला होता.