केळावडे रावण न्यू कॉलनीत पाण्याच्या टंचाईने ग्रामस्थ हैराण

केरी प्रकल्पातून पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे लोक संतप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 12:23 am
केळावडे रावण न्यू कॉलनीत पाण्याच्या टंचाईने ग्रामस्थ हैराण

वाळपई : केरी पंचायत क्षेत्रातील रावण न्यू कॉलनी, केळावडे भागामध्ये गेल्या काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागलेली आहे. केरी पाणी प्रकल्पातून सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गावामध्ये असलेल्या टाकीमध्ये पाण्याचा साठा होत नाही. यामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात पाणी पुरवठा प्रक्रियेमध्ये सुधारणा न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील केळावडे रावण न्यू कॉलनी या भागांमध्ये केरी येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होत असतो. गेल्या काही दिवसांपासून सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भाच्या तक्रारी अनेकवेळा करण्यात आल्या. मात्र या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप्त बनले आहेत. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अन्य सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांना याच पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
केरी भागामध्ये सरकारच्या सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याने कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. गेल्याच वर्षी या ठिकाणी जॅकवेल ही नवीन सुविधा बसविलेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी या प्रकल्पाचा दर्जा वाढविण्यात आलेला आहे. असे असताना सुद्धा या भागामध्ये पाण्याची का भासत आहे, असा सवाल ग्रामस्थांनी केलेला आहे.
गावातील नळ कोरडे
ग्रामस्थांनी या संदर्भात दिलेल्या अधिक माहितीनुसार केरी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे केळावडे या ठिकाणी असलेल्या टाकीमध्ये पाण्याचा साठा होत असतो. त्यानंतर या टाकीमधून गावात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असतो. सध्या या टाकीमध्ये पाण्याचा साठा होत नाही. त्यामुळे या भागातील नळ सातत्याने कोरडे पडू लागलेले आहेत.
फोटो.3go4
पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे अशा प्रकारे रावण न्यू कॉलनी येथील पाण्याची टाकी कोरडी पडली आहे.