भाजप मंडळ अध्यक्षपदी समर्थकांची वर्णी लावण्यासाठी आमदार प्रयत्नशील

आज, उद्या मंडळ अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया


04th January, 12:01 am
भाजप मंडळ अध्यक्षपदी समर्थकांची वर्णी लावण्यासाठी आमदार प्रयत्नशील

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजप मंडळ अध्यक्षपदावर समर्थक कार्यकर्त्याची वर्णी लावण्यासाठी आमदारांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी विशेष रणनीती आखली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप मंडळ अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणार आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रविवारी निवडणूक घेतली जाईल, असे सुकाणू समितीचे सदस्य अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे याबरोबरच आमदार नीलेश काब्राल, माजी खासदार विनय तेंडुलकर, चंद्रकांत कवळेकर, आमदार दिगंबर कामत, अॅड. नरेंद्र सावईकर, प्रा. गोविंद पर्वतकर, सभापती रमेश तवडकर, दामू नाईक हे सदस्य उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक निवडणुकीविषयी चर्चा झाली. शनिवार आणि रविवारी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक होईल. मंडळ अध्यक्षांची निवड झाल्यानंतर मंडळ समित्या स्थापन होतील. त्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि समित्या स्थापन होतील. १० जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. नंतर प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. मतदारसंघातील पक्षाचे सक्रिय सदस्य अध्यक्षपदासाठी मतदान करतील.
सध्या भाजपकडे असलेल्या २८ आमदारांपैकी १४ आमदार काँग्रेसमधून आलेले असून, त्यातील अनेकांनी मंडळ अध्यक्षपदांवर आपापल्या मर्जीतील व्यक्तींची नेमणूक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पक्षासाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केलेल्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून अंतर्गत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि अन्य नेते करत आहेत. प्रदेशाध्यक्षबाबतचा निर्णय मंडळ अध्यक्षांशी चर्चा करून सुकाणू समिती, तसेच केंद्रीय नेते घेतील. भाजपने यावेळी मंडळ अध्यक्षपदासाठी वयाची कमाल मर्यादा ४५ वर्षे इतकी निश्चित केली आहे. त्यामुळेही काही जणांमध्ये नाराजी आहे.
प्रदेशाध्यक्षपदाची निवड फेब्रुवारीत
प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रदेश भाजपकडून माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे आणि दामू नाईक या सहा जणांची नावे श्रेष्ठींकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची निवड फेब्रुवारीमध्ये बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.