‘डीआरआय’ची कारवाई; पुणे-हैदराबाद महामार्गावर ट्रक जप्त
पणजी : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाने अमली पदार्थ तस्करी प्रकरणी पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर छापा टाकला. या छाप्यात डीआरआयने पुणे तसेच गोव्यात आणणारे १.७० कोटी रुपयांचा ८४७ किलो गांजा जप्त केलाआहे.
जप्त केलेला गांजा सिमेंट ब्लॉकची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून तस्करी करत होते. त्यासाठी ड्रायव्हरच्या केबिन आणि ट्रकच्या मुख्य भागाच्या मागे विशेष पॅनल बनवले होते. डीआरआयने गांजासंदर्भात गोव्यात व अलिकडच्या काळात देशात केलेली ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्टी तसेच इतर ठिकाणी गांजाचा पुरवठा होणार असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाला मिळाली होती. तसेच संबंधित गांजा आंध्र प्रदेशातून पुणे मार्गे गोव्यात येत असल्याचीही माहिती गुप्तहेरांकडून डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गोवा विभागाच्या डीआरआयने पुणे - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवली होती.