गोवा विधानसभेचे अधिवेशन ६, ७ फेब्रुवारीला

दोन दिवसांच्या कालावधीमुळे विरोधी पक्षांची सरकारवर टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd January, 12:09 am
गोवा विधानसभेचे अधिवेशन ६, ७ फेब्रुवारीला

पणजी : गोवा विधानसभेचे अधिवेशन ६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस होणार आहे. विधानसभेच्या कमी कालावधीमुळे विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड तसेच आम आदमी पक्षाने सरकारवर टीका केली आहे. पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल तर दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांच्या तासांसह इतर कामकाज होईल.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी अधिवेशनाचे समन्स बजावले आहे. अधिवेशनाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने विधानसभा सत्र सुरू होईल. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सभागृहाला संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासासह शून्य तास, लक्षवेधी सूचना आणि विशेष ठरावांवर चर्चा केली जाईल.

दरम्यान, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांनी विधानसभा अधिवेशन किमान १५ दिवसांचे करण्यासाठी सरकारला सूचना कराव्यात अशी मागणी आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंजी व्हिएगस, प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आणि फ्रान्सिस कुएलो यांनी पत्रकार परिषदेत केली. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने नवीन वर्षात दोन दिवसीय अधिवेशन बोलावल्याबद्दल टीका केली आहे. अधिवेशनासाठी प्रश्न दाखल करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी पर्यंत असणार आहे. 

ही लोकशाहीची थट्टा : युरी आलेमाव

केवळ दोन दिवस अधिवेशन बोलावणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. यावरून हे सिद्ध होते की सरकार महत्त्वाचे मुद्दे हाताळण्यास घाबरत आहे. नोकरभरती, सिद्दिकी प्रकरण, स्मार्ट सिटी प्रकल्प या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. सकारात्मक चर्चेला सरकार घाबरते. यामुळे अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांवर आणला आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.