सिक्कीमचा दरमहा खर्च सर्वाधिक, छत्तीसगडचा खर्च अत्यल्प
पणजी : राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील दरडोई दरमहा खर्चाचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरी पेक्षा अधिक आहे. गोव्यातील शहरी भागात दरडोई दरमहा ९७२६ रुपये तर ग्रामीण भागात ८०४८ रु. खर्च केले जातात, तर शहरी आणि ग्रामीण भागाची राष्ट्रीय सरासरी अनुक्रमे ६९९९ रु. आणि ४१२२ रु. आहे.
केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याने नुकत्याच जारी केलेल्या घरगुती उपभोग्य वस्तूंवरील खर्चाच्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती मिळाली आहे. ज्या राज्यात दरमहा दरडोई खर्च जास्त आहे ते राज्य सधन समजले जाते.
राज्यनिहाय पाहता सिक्कीमच्या शहरी भागातील व्यक्ती उपभोग्य वस्तूंवर दरमहा दरडोई सर्वाधिक १३,९२७ रुपये खर्च करते. यानंतर अरुणाचल प्रदेशचा (९८३२ रु.) क्रमांक लागतो. शहरी भागात दरमहा दरडोई खर्च करण्यात गोवा तिसऱ्या स्थानी आहे.
सिक्कीमच्या ग्रामीण भागातील व्यक्ती सर्वाधिक ९३७७ रुपये खर्च करते. यानंतर गोवा (८०४८ रु.), केरळ (६६११ रु.), त्रिपुरा (६२५९ रु.), अरुणाचल प्रदेश (५९९५ रु.), मिझोरम (५९६३ रु.) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी खर्च छत्तीसगड मध्ये केला जातो. येथे ग्रामीण भागात २७३९ रु. तर शहरी भागात ४९२७ रुपये खर्च केला जातो.
सांख्यिकी खात्याकडून ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान देशातील सुमारे २.६१ लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये गोव्याच्या शहरी भागातील ३६० आणि ग्रामीण भागातील ३६० अशा ७२० घरांचा समावेश आहे.
सर्वेक्षणात ठरविक भागातील लोक कोणत्या गोष्टीवर किती रुपये खर्च करतात, त्यांचा मासिक खर्च किती अशा गोष्टींची माहिती मिळते. याच्या आधारे ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच किरकोळ महागाई दर ठरवताना केला जातो.
दरडोई दरमहा खर्च (रुपयांत)
राज्य / शहरी / ग्रामीण
सिक्कीम / १३,९२७/ ९३७७
अरुणाचल प्रदेश / ९८३२/ ५९९५
गोवा/ ९७२६/ ८०४८
केरळ / ७७८३/६६११
हिमाचल प्रदेश/ ९२२३/५८२५
पंजाब/ ७३५९/५८१७
खर्चाच्या प्रमाणात वाढ-
अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये गोव्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात दरमहा दरडोई खर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२२-२३ मध्ये गोव्यातील शहरी भागात ८७३४ रुपये तर ग्रामीण भागात ७३६७ रुपये खर्च केले जात होते.