जमीन हडप : ईडीकडून १५हून अधिक मालमत्तांचे दस्तावेज जप्त

आलक्रांत्रो डिसोझा आणि ईस्टीवन डिसोझा यांच्या घरांवर छापे


01st January, 12:49 am
जमीन हडप : ईडीकडून १५हून अधिक मालमत्तांचे दस्तावेज जप्त

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल याचे साथीदार आलक्रांत्रो डिसोझा आणि ईस्टीवन डिसोझा यांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापा टाकला. यात ईडीने कोट्यवधी रुपये किमतीचे १५ हून अधिक मालमत्तेचे सेल डिड तसेच इतर दस्तावेज जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसाच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) तसेच विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्यात मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल याचे साथीदार आलक्रांत्रो डिसोझा आणि ईस्टीवन डिसोझा यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. याची दखल घेऊन अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्राथमिक चौकशीनंतर मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार बार्देश तालुक्यातील जमीन हडप प्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात मोहम्मद सुहैल याच्यासह ३६ जणांविरोधात म्हापसा येथील विशेष न्यायालयात (पीएमएलए) सुमारे ७,४०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी ३६ जणांना साक्षीदार केले आहे. यात ईडीने प्राथमिक ३१ मालमत्ता जप्त करून त्यांची किमत ५३५ कोटी असल्याचा दावा केला आहे.
या संदर्भात ईडीने चौकशी सुरू ठेवून मंगळवार, ३१ रोजी पूर्ण दिवस संशयित आलक्रांत्रो डिसोझा आणि ईस्टीवन डिसोझा यांच्या घरांवर छापा टाकला. यावेळी ईडीने दोघांकडून कोट्यवधी रुपये किमतीचे १५ हून अधिक मालमत्तेचे सेल डिड तसेच इतर दस्तावेज जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तांचे उल्लेख ईडी तसेच विशेष तपास पथकाच्या नजरेस आले नसल्याची माहिती समोर आली आहे.