जीएसटी महसुलात ९.६२ टक्के वाढ, तर वॅट महसुलात ६.४१ टक्के वाढ
पणजी : राज्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस भक्कम होत असतानाच गेल्या वर्षी पेक्षा यंदा सरकारच्या तिजोरीत ३६५.४३ कोटी रुपये अधिक जमा झाले आहेत. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२३पर्यंत तिजोरीत ४२४९.३४ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा २०२४ मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ४६१४.७७ कोटी रुपये जमा झाले आहे.
यंदाच्या डिसेंबरमध्ये गत वर्षीपेक्षा ७५.५१ कोटी रुपयांचा अधिक महसूल जमा झालेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. जीएसटी, वॅटसह पर्यटनातून आलेल्या कराचाही महसूल वाढीत वाटा आहे. पर्यटकांचा आकडा वाढल्याने अर्थव्यवस्था सुदृढ होण्यास मदत होत आहे.
राज्याचा जीएसटी महसूल ९ महिन्यात ९.६२ टक्क्यांनी वाढला आहे. कर सुधारणा व आर्थिक व्यवहार वाढल्याचा हा परिणाम आहे. राज्याचा मूल्यवर्धित कर (वॅट) गेल्या वर्षाच्या तुलनेत ६.४१ टकक्यांनी वाढला आहे. जीएसटी आणि वॅट एकत्रित केला तर ही वाढ ८.६० टक्के होते.