१,०४० वाहतूक पोलीस तैनात : किनारी भागांसह मुख्य शहरातही वाहतूक कोंडी
पर्वरी येथे झालेली वाहतूक कोंडी. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देशी पर्यटक स्वतःची वाहने घेऊन गोव्यात दाखल झाले आहेत. यामुळे राज्यातील रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.
दरवर्षी ३१ डिसेंबर दरम्यान राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. यंदाही तशीच स्थिती आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी वाहतूक खात्याकडून ८५० पोलीस तैनात आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला वाहनांची संख्या अधिक असते. त्यामुळे आणखी १९० पोलिसांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे यंदा नववर्षाच्या स्वागताला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १,०४० पाेलीस तैनात केले आहेत. पणजी, वास्को, मडगाव, म्हापसा आणि फोंडा या मुख्य शहरांसह किनारी भागात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. कळंगुट, कोलवा, मिरामार या किनाऱ्यांवर अधिक वाहने येतात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी अधिक होते, असे पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी सांगितले.
वाहने वाढल्यामुळे अपघातांची शक्यता
पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे या काळात अपघातांची शक्यता अधिक असते. पर्वरीत उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा वरचेवर दिसून येतो. या समस्येमुळे स्थानिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय योजण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत, असेही अधीक्षक शिरवईकर यांनी सांगितले.
किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल
दरवर्षीप्रमाणे कळंगुट, बागा, मिरामार, कोलवा, आगोंद किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने पर्यटक नववर्षारंभ साजरा करण्यासाठी दाखल झाले होते. संगीताच्या तालावर ठेका धरत अनेकांनी सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप दिला.