'चर्चेची वार्ता': बेजबाबदार व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे!

'चर्चेची वार्ता'मध्ये अभिप्राय- सरकारी यंत्रणांनी कठोर भूमिका बजावण्याची आवश्यकता

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
31st December 2024, 12:11 am
'चर्चेची वार्ता': बेजबाबदार व्यावसायिकांवर कारवाई होणे गरजेचे!

पणजी : पर्यटकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या वॉटर स्पोर्ट्समधील बेशिस्तीवर नियंत्रण आणण्यासाठी काय करायला हवे? असा प्रश्न दै. गोवन वार्ताच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'चर्चेची वार्ता' या सदरात विचारण्यात आला होता. यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. 

वाचक म्हणतात, गोवा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून पर्यटक इथल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी गोव्यात दाखल होत असतात. अशावेळी वॉटर स्पोर्ट्सबाबत सुरक्षितता महत्त्वाची आहे. पर्यटकांचा जीव धोक्यात घालून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. याकडे पोलीस आणि संबंधित अधिकारी कानाडोळा करत असतील तर सरकारने त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.

यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रियाः-

पर्यटकच नव्हेत तर गोव्याच्यी जनता सुद्धा किनार्‍यावर सुरक्षित नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणा व्यवस्थित कार्यरत राहणे आवश्यक आहे. खरे तर समुद्र किनार्‍यावर ज्या बेशिस्त पद्धतीने व्यवसाय चालू आहे त्यावर कुणाचेच लक्ष नाही. मग ते पोलीस म्हणा नाहीतर आणखीन कुणी, समुद्र किनारी भागात पर्यटकांना अक्षरशः लुबाडतात. यामुळे गोव्याचे नाव देखील खराब होत चालले आहे. अशा ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावेत आणि वाॅटर अॅक्टिविटीबाबत कडक नियम आणावेत, जेणेकरून अशी घटना भविष्यात होणार नाही.- अमीर बेळेकर 

-------------------------------------
गोमंतकीय तरुणांनी अशा व्यवसायांमध्ये उतरून चांगली कामगिरी करावी, कारण परप्रांतीयांच्या हातात व्यवसाय गेल्यावर अशा घटना घडतात.- संदेश रेडकर 
-------------------------------------
गोव्यात येणाऱ्या परदेशी तसेच देशी पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्स राईड आवडते. त्यांना इथले समुद्रकिनारे आवडतात. मात्र जलसफारी आणि जलक्रीडा करताना सुरक्षा महत्त्वाची आहे. सरकारने या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक आहे. लाईफ जॅकेट आवश्यक असूनसुद्धा लहान मुलांना अशाप्रकारच्या राइडमध्ये जाण्यास बंदी घालावी.-  स्वर्णा रेडकर
----------------------------------
अशा प्रकारचे व्यवसाय बंद करावेत अन्यथा हकनाक जीव जाण्याचे प्रमाण वाढेल.- महेश तळवणेकर
---------------------------------------
काहीही करा, पण कुणीही अशा गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत. पोलीस आणि बंदर अधिकारी चिरी मिरी खाऊन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुधारण्याची गरज आहे.-  नीलेश धुरी
------------------------------------
दुर्देवी घटना. लाईफ जॅकेटसारखी सुविधा नसताना पाण्यात असले प्रकार करणे ही मोठी चूक आहे.-  राज लोटलीकर
-----------------------------------
अशावेळी आमदार, मंत्री, सरपंच, पंच बदलले पाहिजेत.-  राजू पारकर
---------------------------------
असले व्यवसाय कायमचे बंद करा, अन्यथा तुमच्या जीविताची आम्ही काळजी घेऊ शकत नाही असे तिकीटांवर लिहून द्या.-  दीपक गोठीवरेकर

हेही वाचा