अखेर हॉटेल व्यवस्थापनानेच गेट कापून वाट केली मोकळी

काणकोण-राजबाग येथील प्रकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st December 2024, 11:40 pm
अखेर हॉटेल व्यवस्थापनानेच गेट कापून वाट केली मोकळी

राजबाग येथील हॉटेल व्यवस्थापनाने घातलेली गेट काढून टाकण्याची मागणी घेऊन हॉटेलच्या लॉबीत गेलेले राजबाग तारीर येथील नागरिक व मल्लिकार्जुन देवालयाचे महाजन. (संजय कोमरपंत)

काणकोण : राजबाग-काणकोण येथील एका हॉटेल व्यवस्थापनाने पागी समाजाच्या घरवईवर तसेच सुरंग पागी यांच्या घरात जाणाऱ्या वाटेवरील कुंपणावर लोखंडी पत्र्याची गेट लावून घरात जाणारी वाट सोमवारी (दि. २९) बंद केली होती. स्थानिक नागरिक व सुरंग पागी याचे पुत्र अशोक पागी व स्थानिक नगरसेवक गंधेश मडगावकर यांनी त्यासंबंधी गेट लावणाऱ्या व्यक्तींना जाब विचारला असता त्यांना हॉटेलच्या सुरक्षारक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
यासंबंधी स्थानिक नगरसेवक गंधेश मडगावकर यांनी काणकोण पालिकेला याची माहिती दिल्यावर पालिकेचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर, नगराध्यक्षा सारा शंभा देसाई, नगरसेवक धीरज नाईक गावकर, शुभम कोमरपंत, गंधेश मडगावकर, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, माजी नगराध्यक्ष श्याम देसाई, श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवालयाचे महाजन शंभा देसाई, रणजीत देसाई, महाबळेश्वर देसाई, पूजार भिकर, देवस्थानचे माजी अध्यक्ष राजेंद्र देसाई, शांताजी गावकर, रमेश देसाई, सम्राट भगत, अंकुश देसाई यांनी राजबाग येथील विठ्ठल रखुमाई देवालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनावर मोर्चा नेला व पारंपरिक वाटेवरील कुंपणावर बसविलेले लोखंडी गेट काढण्याची मागणी केली.
दरम्यान, हॉटेल व्यवस्थापन त्यांची मागणी मान्य करून घेण्यास राजी नसल्याने अखेर काणकोणचे उपजिल्हाधिकारी मधु नार्वेकर यांनी सदर बेकायदेशीररीत्या बसविलेले गेट काढून टाकण्याचा आदेश हॉटेल व्यवस्थापनाला दिला. शेवटी हॉटेल व्यवस्थापनाने कटरच्या सहाय्याने सदर गेट काढून टाकली व सुरंग पागी व पागी समाजाच्या व्यक्तीच्या घरवईवर जाणारा मार्ग मोकळा करून दिला.

हेही वाचा