दहा दिवसांत नारळाच्या किमतीत भरमसाट वाढ

पिकांवर विविध रोग, माकडांचा उपद्रव यामुळे उत्पादन कमी


01st January, 12:53 am
दहा दिवसांत नारळाच्या किमतीत भरमसाट वाढ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागणीप्रमाणे बाजारात पुरवठा नसल्याने नारळाचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दहा दिवसांत नारळाचा दर १० ते १५ रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती पणजीतील विक्रेत्यांंकडून मिळाली. आम्हालाच होलसेलमध्ये नारळ महाग मिळता. त्यामुळे वाढीव दराने विक्री करावी लागते, असे त्यांचे म्हणणे आहे. मोठा आकाराच्या नारळासाठी बाजारात ४५ ते ५० रुपये मोजावे लागत आहेत.
आकाराप्रमाणे नारळाचा दर ठरतो. अन्य भागांच्या तुलनेत पणजीत नारळ थोडे महाग झाले आहेत. बाजारात सर्वांत लहान आकाराचा नारळ २५ रुपयांना मिळत आहे. मध्यम आकाराचा नारळ ३५ ते ४० रुपयांना आहे. १५ दिवसांपूर्वी २५ रुपयांना मिळणारा नारळ आता ४० रुपयांना मिळत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला नारळाचा दर वाढायला सुरुवात झाली होती. नाताळानंतर दर गगनाला भिडले आहेत. गोमंतकीयांच्या ताटातील रोजचे पदार्थ नारळाशिवाय होऊच शकत नाहीत. नारळांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत, असे एका विक्रेत्याने सांगितले.

उत्पादनात घट
नारळाला आणि माडाला विविध रोग होत आहेत. माकडांचा उपद्रव वाढल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती झाली आहे. त्याचा परिणाम नारळाच्या किमतीवर झाला आहे, असे नारळाचे व्यापारी उदय महांंबरे यांनी सांगितले.


गाेव्यात नारळ बाहेरील राज्यांतूनही येतात. राज्यात नारळाचे उत्पादन कमी झाले असे म्हणता येणार नाही. मागणी वाढली आहे. नारळ काढणा ऱ्या पाडेलीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे नारळ महाग झाले आहेत.

_ संंदीप फळदेसाई, संचालक, कृषी

आकारानुसार १० ते २० रुपयांचा फरक
आकाराने छोटे नारळ दहा दिवसांपूर्वी १५ रुपयांना मिळत होते, त्याची किंमत आता २५ रुपयांवर पोहोचली आहे. मध्यम आकाराचा नारळ पूर्वी २५ रुपयांना मिळत होता, तो आता ४० रुपयांना विकला जात आहे. ३० रुपयांंना मिळणारा मोठ्या आकाराचा नारळ ४५ ते ५० रुपयांना मिळत आहे. भाटकारांकडून होलसेलमध्ये नारळांची खरेदी केल्यास थोड्या स्वस्त दरात मिळतो.


गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संंस्था मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून नारळाची खरेदी करते. एका माडावर चढण्यासाठी पाडेली १०० ते १५० रुपये घेतो. सत्तरी तालुक्यात खेती माकड माडावरील नारळ खातात. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. गोवा बागायतदाराच्या सुपर मार्केटमध्ये नारळाचा दर बाजाराच्या तुलनेत कमी आहे.
_ अॅड. नरेंंद्र सावईकर, अध्यक्ष, गोवा बागायतदार संंस्था