गोवा पोलिसांची कारवाई : १ जानेवारी ते २९ डिसेंबरपर्यंत २,०९६ गुन्हे नोंद
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत २९ खून आणि १०६ बलात्कारांची गुन्हे नोंद झाली आहेत. या कालावधीत भारतीय दंड संहिता (आयपीएस) आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांखाली २,०९६ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांतील १,८४४ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. यशस्वी तपासाची ही टक्केवारी ८७.९८ टक्के एवढी आहे. तर गंभीर गुन्ह्यांच्या तपासाची टक्केवारी ९६.६७ टक्के एवढी आहे.
राज्यात वरील कालावधीत २९ खून, १०६ बलात्कार, २९ खून करण्याचा प्रयत्न, ३ दरोडे, १३ जबरी चोरी अशा एकूण १८० गंभीर गुन्ह्यांची नोंद उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा पोलिसांनी केली आहे. त्यांपैकी फक्त ६ बलात्कार प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण व्हायचा आहे. इतर सर्व गंभीर गुन्ह्यांचा तपास १०० टक्के पूर्ण झाला आहे. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांच्या यशस्वी तपासाची टक्केवारी ९६.६७ इतकी राहिली. घरफोडी, मोबाईल चाेरी, वाहनांची चोरी, सोनसाखळ्या चोरी, फसवणूक, विश्वासघात करणे, अपहरण, मारामारी, अपघाती मृत्यू व इतर भारतीय दंड संहिता (आयपीएस) आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांखाली मिळून २,०९६ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांतील विविध चोऱ्यांचा छडा लावण्याची टक्केवारी कमी असल्यामुळे यशस्वी तपासाची टक्केवारी ८७.९८ टक्के एवढी आहे.
याशिवाय या वर्षात अमलीपदार्थ तस्करी व सेवन प्रकरणी राज्यभरात १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. यात १८८ जणांना अटक करण्यात आली असून तब्बल ९.८१ कोटी रुपये किमतीचा २७४ किलो अमलीपदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
३.३ लाख वाहनचालकांवर कारवाई
वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बहुतांशी अपघात घडत असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस सक्षमपणे काम करत असून सिग्नल, तसेच रहदारीच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर नजर ठेवली जात आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेकडून ‘स्पीड गन’चा अवलंब केला जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३.३ लाख चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याद्वारे २०.५३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ३२ हजार ५३६ जणांचे वाहन परवाने निलंबित करण्याची शिफारस वाहतूक खात्याकडे करण्यात आली आहे.