सुदैवाने घटनेत जीवित हानी नाही
फोंडाः गाळवाडा-प्रियोळ येथील संदेश च्यारी यांच्या घराला गुरुवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत खोलीत विनावापर पडून असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घराचे नुकसान झाले. गुरुवारी रात्री संदेश च्यारी कुटुंबियांसह बंधूंच्या घरी गेल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कपडे, भांडी, पुस्तके व अन्य साहित्य खाक झाल्याने अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
संदेश च्यारी यांच्या १४ वर्षीय मुलाची शस्त्रक्रिया झाल्याने ते कुटुंबियांसह सीमेपाईण-मंगेशी येथील काकाच्या घरी राहत होते. गुरुवारी रात्री ११.३० वा. संदेश यांची पत्नी व मुलगी सीमेपाईण येथे गेले होते. त्यानंतर घराला आग लागली. डोंगराळ भाग असल्यामुळे आगीची कुणालाच चाहुल लागली नाही. आगीत विनावापर असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने लोकांनी च्यारी यांच्या घराकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुंडई अग्निशमन दलाला कळवण्यात आले. घर डोंगराळ भागात असल्याने कर्मचाऱ्यांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. स्फोट झाल्याने भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहे. आगीत सर्व साहित्य खाक झाल्याने च्यारी कुटुंबीय बेघर झाले आहे.
शस्त्रक्रिया केलेल्या मुलाला डोंगराळ भागातील घरात ये-जा करणे कठीण होत असल्याने संदेश च्यारी भावाच्या सीमेपाईण येथील घरात राहत होते. पुढील काही दिवसांत मूळ घरात येण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पत्नी व मुलीने घराची साफसफाई केली होती. रात्री उशिरा घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मुलांचे पाठ्यपुस्तकेही खाक झाली आहेत. मुलगा नववीत आहे, तर मुलीने बारावीचे शिक्षण घेतले आहे.