तपास पूर्ण होईपर्यंत अपघातग्रस्त बोटीचा परवाना राहणार निलंबित

जलसफर बोटीची अचानक तपासणी करण्याची शिफारस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22 hours ago
तपास पूर्ण होईपर्यंत अपघातग्रस्त बोटीचा परवाना राहणार निलंबित

पणजी : दुर्घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कळंगुटमधील दुर्घटनाग्रस्त जलसफर बोटीचा परवाना निलंबित ठेवण्याचा निर्णय कॅप्टन ऑफ पोर्टने घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारला पत्र लिहिले आहे. दरम्यान, पर्यटन खात्याने जलसफर बोटींची अचानक तपासणी करावी, अशी शिफारस कॅप्टन ऑफ पोर्टने सरकारला केली आहे.

कळंगुट समुद्रात बुधवारी जलसफरीवेळी एक बोट उलटली. खेड - महाराष्ट्रातील सूर्यकांत पोफळकर यांचा अपघातात मृत्यू झाला. तर, जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या बोटमालक मीना कुतिन्होसह दोघे ऑपरेटर मिळून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बोटचालक धारेप्पा झिराली आणि इब्राहिम शरीफ साब यांनाही अटक केली.

या दुर्घटनेनंतर वॉटरस्पोर्ट्स असोसिएशन, पर्यटन खाते आणि कॅप्टन ऑफ पोर्टस यांची संयुक्त बैठक झाली. अपघातानंतर कॅप्टन ऑफ पोर्टस यांनी बोटीची पाहणी केली. बोटीत कोणताही तांत्रिक दोष नाही. बोटीवरील लोकांची संख्या वाढल्यामुळे ही बोट समुद्रात उलटली, असे कॅप्टन ऑफ पोर्टस ओक्टाव्हियो रॉड्रिग्ज यांनी सांगितले. कॅप्टन ऑफ पोर्टस फक्त बोटींची तपासणी करुन परवानगी देतो. बोटींचे नियमन करण्याची जबाबदारी पर्यटन खात्याची आहे. यामुळे आता पर्यटन खात्याने बोटींची पाहणी करण्यासाठी अचानक भेटी देण्याची गरज आहे. या बैठकीत पर्यटन खात्याने अचानक भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ऑक्टाव्हियो रॉड्रिग्ज यांनी दिली.

गोव्यात ३ हजारांहून अधिक बोटी आहेत. प्रत्येक बोटीची प्रवासी क्षमता निश्चित असते. बोटींचे नियमन करण्याची जबाबदारी पर्यटन खात्याची आहे. जलसफर धोरणामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे, असे कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑक्टाव्हियो रॉड्रिग्ज यांनी सांगितले. 

हेही वाचा