‘अष्टगंधा अर्बन’मध्ये फसवणूक; ११ संचालकांविरोधात गुन्हा दाखल

११.२८ कोटींचा गंडा : आर्थिक गुन्हा विभागाची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
‘अष्टगंधा अर्बन’मध्ये फसवणूक; ११ संचालकांविरोधात गुन्हा दाखल

पणजी : पिर्ण - बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीमध्ये ११.२८ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) गुन्हा दाखल केला आहे. त्यात सोसायटीचे माजी संचालक रवींद्र नाईक, दिगंबर परब, मोहनदास देसाई, श्रद्धा नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर, प्रकाश ए. नाईक, चंद्रशेखर बर्वे, प्रकाश कांदोळकर आणि भारत परब यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार, संशयितांनी काल्पनिक आणि बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज दिल्याचे दाखवले. तसेच इतर बेकायदेशीर कृत्ये करून सोसायटीचा निधी अनधिकृतपणे काढला. तसेच वैयक्तिक खात्यात निधीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माजी संचालक मंडळ सोसायटीचे ठेवीदार तसेच सदस्यांच्या ठेवी परत करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे त्यांची ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याची दखल घेऊन ईओसीचे अधीक्षक अर्शी अादिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रमेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी सोसायटीचे माजी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यात माजी संचालक रवींद्र नाईक (मुळगाव - डिचोली), दिगंबर परब (डिचोली), मोहनदास देसाई (कुडचडे), पिर्ण - बार्देश येथील श्रद्धा नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक आणि प्रकाश ए. नाईक, सिरसई येथील कृष्णा हळर्णकर, चंद्रशेखर बर्वे (अस्नोडा - बार्देश), प्रकाश कांदोळकर (पार्शे - पेडणे) आणि भारत परब (अस्नोडा - बार्देश) यांचा समावेश आहे.

प्रशासक समिती अध्यक्षांकडून तक्रार

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, १४ जुलै २०२३ पूर्वी माजी संचालक मंडळाने एकमेकांच्या संगनमताने, अप्रामाणिक हेतूने विविध बेकायदेशीर कृत्ये करून अष्टगंधा अर्बन क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निधीचा गैरवापर केल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा