एटीएफ इंधन तस्करीप्रकरणी आणखी आठ जणांना अटक

सीबीआयची कारवाई : चार टँकर जप्त, यापूर्वी चौघांना केली होती अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15 hours ago
एटीएफ इंधन तस्करीप्रकरणी आणखी आठ जणांना अटक

पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने वास्को येथील गांधीनगर - वरुणापुरी येथे छापेमारी करून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल साठ्यातून विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी सीबीआयने आणखीन आठ जणांना अटक करून चार टँकर जप्त केले आहे.

गांधीनगर-वरुणापुरी येथे एटीएफ या ज्वलनशील पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक टी. संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्नेहा सहानी, संजीवन नाईक, अपर्णा चोडणकर व इतर पथकाने गुरुवार, १२ रोजी सायंकाळी ३.३० ते रात्री ११.३० दरम्यान वास्को येथील गांधीनगर - वरुणापुरी येथील मुख्य रस्त्यावर छापेमारी केली होती. त्यावेळी सीबीआयने मुख्य संशयित विठ्ठल चव्हाणसह मंतेश पवार, महेंदर पास्सी, मैनुद्दीन शेख या चार जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून २.७५ लाख रुपये किमतीचे ३ हजार लिटर एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) जप्त केले. तसेच संशयिताकडून वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने वरील संशयितांची कसून चौकशी केली असता, यात आणखीन संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार, सीबीआयने प्रकाश चव्हाण, राजेंद्र, मंजुनाथ मदार, रोहित सातीहल, संतोष कुमार, लालसाहेब सिंग, उमेश पटेल आणि सुजीत कुमार पटेल या आठ जणांना अटक केली आहे. तसेच एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) तस्करी करण्यासाठी वापरलेले चार टँकर जप्त केले.

संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

संशयितांना मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने सर्व संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली. संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले असून पुढील सुनावणी २ जानेवारी २०२५ रोजी ठेवली आहे. 

हेही वाचा