फोंडा : कोने-प्रियोळ येथे गुरुवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास तीन कारमध्ये झालेल्या अपघातात रत्नागिरी - महाराष्ट्रमधून आलेले ६ पर्यटक जखमी झाले. जखमींमध्ये विनायक कृष्णा साखळकर (७१), वैभव विनय साखळकर (३८), विद्या विनय साखळकर (६९), श्रीरंग निनाद तेंडुलकर (७), प्रिया निनाद तेंडुलकर (३६) व निनाद नारायण तेंडुलकर (४१, सर्व जण रत्नागिरी) यांचा समावेश आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीए -०४-एच -०५२६ क्रमांकाची कार म्हार्दोळहून फोंडा येथे जात होती. कोने येथील वळणावर एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या एमएच-०८-एएक्स-२४३१ क्रमांकाच्या कारला समोरासमोर धडक बसली. त्यावेळी मागाहून म्हार्दोळच्या दिशेने जाणाऱ्या जीए-०३-व्ही -०७२६ क्रमांकाच्या कारची धडक रत्नागिरी येथे नोंदणी असलेल्या कारला बसली. अपघातात तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गावडे यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.