पणजी : गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेच्या कोठडीतून पसार झालेला आणि ८ दिवसांनी केरळ पोलिसांच्या मदतीने अटक केलेला सिद्दिकी उर्फ सुलेमान खान (५०) याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बुधवारी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सिद्दिकीला गुरुवारी डिस्चार्ज देऊन जुने गोवा पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे.
सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला जमीन हडप प्रकरणी विशेष तपास पथकाने १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर सिद्दिकीला रायबंदर येथील गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.
सिद्दिकीने १३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कोठडीतून पलायन केले होते. त्यासाठी त्याने आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याची मदत घेतली होती. त्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने ईर्नाकुलम - केरळ पोलिसांच्या मदतीने संशयित सिद्दिकीला २१ रोजी अटक केली. त्यानंतर सिद्दिकीला २३ रोजी गोव्यात आणून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्या. मनिषा नार्वेकर यांनी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. याच दरम्यान बुधवारी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बुधवारी दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे किरकोळ शस्त्रक्रिया करून गुरुवारी डिस्चार्ज दिला. त्यानंतर सिद्दिकीची जुने गोवा पोलिसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.