सासष्टी : वार्का येथे घरफोडी; रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th December, 09:44 pm
सासष्टी : वार्का येथे घरफोडी; रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

मडगाव : वार्का येथील अंतोनेता फर्नांडिस यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ६८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह ४० हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वार्का येथील अंतोनेता मार्सेलिना रोमुलस रॉड्रिग्ज फर्नांडिस यांच्या ग्लोरिया चर्चनजिकच्या निवासस्थानाचा प्रवेशव्दाराची कडी तोडून चोरी करण्यात आली. फर्नांडिस कुटुंबीय मंगळवारी रात्री पावणेबारा ते पहाटे ३.५३ यावेळेत घरात नव्हते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. 

चोरट्यांनी २६ ग्रॅम पेंडट असलेला १ चेन, १२ ग्रॅम वजनाची एक बांगडी, ३२ ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, कानातील ४ ग्रॅमची रिंग, १० ग्रॅमची रिंग व दोन ब्रेसलेट अशा मुद्देमालासह युरो चलन व रुपये असे ४० हजाराची रक्कम चोरी केली. याप्रकरणी कोलवा पोलिस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक रक्षा नाईक पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा