सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांची कन्या मृणाल कुलकर्णी हिने आपली स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. आता ती चतुरस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इतकेच नव्हे तर अभिनय हा त्यांच्या जितका जवळचा विषय आहे. तितकाच दिग्दर्शन सुद्धा आणि दिग्दर्शक म्हणून तिने काही चित्रपटांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मृणाल कुलकर्णी हिच्या कारकीर्द विषयी तिच्यासोबत केलेली बातचीत...
मृणालताई, चित्रपटाच्या दृष्टीने हे वर्ष फार चांगले गेले. आता वर्ष संपत आहे. कसे पाहतेस याकडे?
खरे सांगायचे तर माझ्यासाठी मात्र हे वर्ष फारसे काही चांगले गेले नाही. माझी आई खूप आजारी होती आणि त्यात ती वारली. त्यानंतर मी आधी जे चित्रपट केले होते. ते सगळे एका महिन्यात प्रदर्शित झाले. त्यामुळे तो महिना माझ्यासाठी खूप चांगला होता. आता हे वर्ष संपताना, माझ्या कामाबद्दल मी फार समाधानी आहे. कारण तीन अतिशय वेगळ्या प्रकारचे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाले. एक मराठी, एक हिंदी, एक हिंदी वेब सिरीज अशी तीन वेगवेगळी कामे झाली. तीन वेगवेगळ्या भूमिका होत्या. माझ्यावर ज्या गोष्टीचा प्रभाव आहे, त्या साहित्यावर आधारित हिंदी फिल्म होती. ज्याचे नाव होते ‘ढाई अक्षर’, एक वेब सिरीज होती हिंदी ‘पैठणी नावाची. एक मराठी फिल्म ‘गुलाबी’ जी अगदी हलकीफुलकी होती. यावर्षी प्रदर्शित झालेल्या या तिन्ही कलाकृती प्रेक्षकांना आवडल्या.
मृणाल कुलकर्णी ही अशी अभिनेत्री आहे जी भाव खाऊन जाते. जेव्हा तू एखादी भूमिका निवडतेस तेव्हा काय सुरू असते तुझ्या मनात?
मला असे वाटते की, माझी निवड नेहमी उत्तमच असते आणि मनाला पटेल अशी भूमिका येईपर्यंत माझी थांबण्याची तयारी असते. मला कसलीही घाई नसते. की जे काही काम येईल ते लगोलाग मला स्वीकारले पाहिजे असे काही नाही आणि तसे मी कधीच केले नाही. कारण त्या प्रकारच्या कामावर माझा विश्वास नाही. जे स्वत:ला आवडते आणि जे तुम्हाला इतरांना दाखवावे असे वाटेल, जे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे तुम्हाला वाटते, ते काम करावे, असे माझे नेहमीचे धोरण असते. काही लोक असे म्हणू शकतील की, हिला कामे मिळत गेली म्हणून ही असे म्हणू शकते. पण आता मी माझ्यापुरतेच बोलणार ना. त्यामुळे माझ्यापुरते मी ठरवले आहे की, मला जे पटेल आणि आवडेल, रुचेल, त्या पद्धतीने मी लोकांसमोर आले पाहिजे.
आम्ही जेव्हा एक जाहिरात टीव्हीवर पाहतो, तोच चेहरा आताही, अनेक वर्षानंतर तू तशीच दिसतेस काय रहस्य आहे तुझ्या तरुणपणाचे?
मी एका वाक्यात याचे उत्तर देईन की, ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या नक्की करायच्या आणि ज्या करणे योग्य नाही, त्या नाही करायच्या नाही. बस हेच आहे रहस्य.
नवी पिढी आणि महिला वर्ग स्वतःकडे फारसे लक्ष देत नाही. त्यांच्यासाठी तू काय टीप्स देशील?
रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. हे आपल्याला माहित आहे. खरं तर. मला वेगळे काही सांगण्याची गरज नाही. पण व्यायाम नक्कीच केला पाहिजे. दुसरे म्हणजे तुम्ही सगळे खा, तुम्हाला पाहिजे ते खा पण प्रमाणात खा आणि तिसरं म्हणजे तुम्हाला जे आवडते त्या गोष्टी तुम्ही जरूर केल्या पाहिजेत. म्हणजे माझ्याच क्षेत्राबद्दल बोलायचे झाले, तर कामामधून काम, कामामधून काम असे करत करत मी माझ्या छंदाला वेळ नाही दिला. माझ्या कुटुंबाला वेळ नाही दिला, तर तो आनंद माझ्या चेहऱ्यावर नाही दिसणार. म्हणजेच हे सर्व करत राहिले पाहिजे. त्यातच खरे सुख आहे. मला वाटते आनंदी राहण्यामागे हे एकच उत्तर आहे.
तू अभिनेत्री म्हणून फार प्रसिद्ध असताना दिग्दर्शक होण्याचा विचार कधी आणि कसा मनात आला?
मी लेखकांच्या कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे. माझ्या घरी सगळे लिहिते होते. मी पण लिहायची, वर्तमानपत्रांमध्ये माझे कॉलम्स असायचे आणि मला नेहमी असे वाटायचे की, मला जे विषय मांडायचे आहेत ते मला कधी मांडायला मिळतील. म्हणजे अभिनेत्री हे फारच छोटे काम आहे. कोणीतरी लिहिणार, कोणीतरी दिग्दर्शित करणार. मग मी फक्त एक भूमिका करायची. याच्यापेक्षा जास्त आशय पोहोचवण्याचे काम आपण करू शकतो, असे मला नेहमी वाटायचे आणि मग अशाच एका क्षणी मी माझी पहिली चित्रपट कथा लिहिली आणि त्या कथेचा चित्रपट दिग्दर्शित केला. लोकांना तो खूप आवडला. त्याला पारितोषिके देखील मिळाली. सिनेमागृहामध्ये पण छान चालला. त्यामुळे मला असे वाटले की आपण स्टोरी टेलर बनू शकतो. आपण कथा सांगू शकतो. या माध्यमातून आणि इतकी वर्षं अभिनेत्री म्हणून जो अभ्यास झाला होता, कॅमेऱ्याच्या मागे राहण्यात मला पहिल्यापासूनच रस होता आणि त्या अभ्यासाचा उपयोग मला दिग्दर्शक म्हणून नक्कीच झाला. माझी स्क्रिप्ट मी स्वत: लिहिते. जे विषय मला मांडायचे आहेत ते मी स्वत: लिहितेही, दिग्दर्शितही करते. तेव्हा मी अभिनय करायला फार उत्सुक नसते. कधी एखादा रोल असला तर तो आवर्जून करते. असे ‘प्रेम म्हणजे प्रेम’ या माझ्या पहिल्या सिनेमात मी एक छोटीशी भूमिका केली होती. तर सहेला रे मध्ये एक भूमिका केली, कारण मला वाटलं की ती भूमिका माझ्या मनाच्या जवळ आहे, विषय ही जिव्हाळ्याचा होता आणि मी चांगल्या पद्धतीने मांडू शकते आणि मला ते सहज जमले ही.
कलाकार जेव्हा दिग्दर्शक होतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी विसरायच्या असतात, तर काही गोष्टी शिकायच्या असतात. तू नेमके काय केले?
दिग्दर्शक झाल्यावर काहीही विसरायचे नसते. कलाकार जेव्हा दिग्दर्शक होतो, तेव्हा त्याला बरच काही शिकावे लागते इतकेच नव्हे, तर नवीन बरेच काही शिकायला मिळते. त्याला कारण एक म्हणजे, तुमचे डोके इथे खूप शांत पाहिजे. कारण अभिनय करताना तुमच्यावर फक्त स्वत:ची जबाबदारी असते आणि दिग्दर्शन करताना इतर शंभर लोकांची जबाबदारी तुमच्यावर असते. त्यांची कामे व्यवस्थित झाली, तर तुम्हाला हवा असलेला आशय मांडता येतो. त्यामुळे तिथे तुम्हाला खूपच गोष्टी शिकाव्या लागतात. तुमच्या चित्रपटाचा हिरो हा तुमचा विषय असतो आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे झाले तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हाच ते शक्य होते.
गो. नि. दांडेकरांच्या घरातील तू एक व्यक्तिमत्व, वारस आहेस. बाबांनी ज्या कथा, कादंबऱ्या लिहिल्या किंवा प्रवास वर्णने लिहिली, खास करून इतिहासावर त्यांनी मेहनत घेतली. इतिहास समृद्ध केला. त्या विषयांवर लेखक म्हणून काही लिहिण्याचा विचार आहे का तूझा?
मला खूप गोष्टी मला करायच्या आहेत अजून. नक्कीच आहे हे लिस्टवर. पण आता ज्याच्यावर मी फोकस केला आहे, त्या गोष्टी मला नीट करू दे. मग ‘वो दौर भी आएगा।’
तुमचा मुलगा परत अभिनयात येणार आहे अशी चर्चा होती. त्याबद्दल काय सांगशील?
विराजेस अभिनयात येणार म्हणजे त्याने झीची मालिका आधीच केली, जिचे नाव आहे, माझा होशील ना. आणि त्याचे पाहिले प्रेम रंगमंच आहे. त्याचे नुकतंच गालिब नावाचे नाटक खूप लोकप्रिय झाले. त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘वर वरचे वधू वर’ हे नाटक उत्तम चाललेले आहे. त्यात सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे कलाकार आहेत. त्यामुळे तो त्याच्या मार्गाने चालला आहे. त्याची पत्नी शिवानी ही झी वरच्या ‘शिकवीन चांगला धडा’ या मालिकेतून खूप लोकप्रिय झाली आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये सर्व मन:पूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत, याचा मला खूप आनंद आहे आणि अभिमान देखील.
एखाद्या भूमिकेवर किंवा एखादी स्क्रिप्ट आली तर घरी चर्चा करता का?
हो. नक्की चर्चा करतो. पण आता मालिकांच्या बाबतीत कोणालाच माहित नसते की मालिका कोणते वळण घेणार आहे. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे आम्ही चर्चा करू शकत नाही. विराजसच्या नाटकांचे अर्थातच घरात वाचन होते आणि त्याच्यावरची मते आम्ही मांडतो. पण फक्त मते मांडण्यापुरतेच. कारण हा प्रत्येकाचा व्यवसाय आहे आणि त्याने तो त्याच्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे, शिस्तबद्धपणे करावा, याच्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच एकमेकांच्या पाठीशी उभे असतो. पण ढवळाढवळ करत नाही.
आगामी प्रोजेक्ट काय? म्हणजे दिग्दर्शक किंवा अभिनेत्री म्हणून काय येत आहे?
आता मी निश्वास सोडते, कारण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पुढच्या वर्षी मुक्ताई हा चित्रपट आहे. दिग्पाल लांजेकारांनी दिग्दर्शित केला आहे. नवीन वर्षातला तो पहिला चित्रपट असेल. त्यानंतर दोन चित्रपट आहेत. एक चित्रित झालेला आहे आणि दुसरा चित्रित होणार आहे. हे तीन चित्रपट आहेत आणि माझा पुढचा दिग्दर्शकीय चित्रपट देखील येईल २०२५ मध्ये अशी मी अपेक्षा करते.