चार फलंदाजांनी झळकावली अर्धशतके : बुमराहचे ३ बळी
मेलबर्न : मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा चौथा कसोटी सामना आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुढील दोन कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या आहेत.
चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात १९ वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने पदार्पण केले आणि आपल्या दमदार खेळाने सर्वाचेच लक्ष्य वेधले. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. खेळ थांबला तेव्हा स्टीव्ह स्मिथ ६८ धावांवर आणि पॅट कमिन्स ८ धावांवर नाबाद परतले.
मेलबर्नमध्ये भारताने दोन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, पण कर्णधार रोहितचा हा निर्णय अद्यापतरी योग्य ठरला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी पहिल्या दिवशी अर्धशतके झळकावली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ख्वाजा आणि कॉन्स्टन्सने शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली. कॉन्स्टस ६५ चेंडूत ६० धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि २ षटकार आले. विशेष बाब म्हणजे या युवा फलंदाजाने जसप्रीत बुमराहवर रॅम्प शॉट्स खेळले आणि अनेक चौकार मारले. या कारणामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. कॉन्स्टसला रवींद्र जडेजाने बाद केले.
दुसऱ्या विकेटसाठीही अर्धशतकी भागीदारी झाली. दुसरी विकेट ख्वाजाच्या रूपाने पडली. १२१ चेंडूत ५७ धावा करून तो बाद झाला. त्याच्या बॅटमधून ६ चौकार आले. बुमराहने ख्वाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मग स्मिथ आणि लॅबुशेन या दोघांनी ८३ धावांची भागीदारी केली.
लॅबुशेन १४५ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ७२ धावा करून बाद झाला. सुंदरने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श स्वस्तात बाद झाले. हेड शून्यावर तर मार्श ४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर मात्र, २ बाद २३७ धावसंख्येवरून यजमान संघाची स्थिती ५ बाद २४६ धावा अशी झाली.
यानंतर ॲलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, कॅरी ४१ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. आकाशदीपने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट २९९ धावांवर पडली. यानंतर कमिन्स आणि स्मिथने डावाची धुरा संभाळली आणि खेळ थांबेपर्यत एकही विकेट पडू दिली नाही. भारताकडून बुमराहने ३ बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच दिवशी एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वास्तविक, एकूण ८७ हजार २४२ प्रेक्षक मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. हा एक नवीन विक्रम आहे. ७७ वर्षांच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचलेल्या प्रेक्षकांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. एबीसी स्पोर्ट्सने पोस्ट केले की, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीचा हा एक नवीन विक्रम आहे. मेलबर्न स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते आणि चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या दमदार कामगिरीचा त्यांनी आनंद लुटला.
चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहची सुरुवात काही खास नव्हती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टासने त्यांच्याविरुद्ध वेगवान धावा केल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने पुन्हा लय मिळवली. दुसऱ्या सत्रात उस्मान ख्वाजा (५७) याला बाद करून त्याने पहिली विकेट घेतली. यानंतर त्याने ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शला सलग दोन षटकांत बाद केले.
या मालिकेत आतापर्यंत जबरदस्त फॉर्मात असलेला हेड भोपळाही फोडू शकला नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श १३ चेंडूत केवळ ४ धावा करू शकला. मार्शची विकेट घेऊन बुमराह भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे.
इशांत शर्माला सोडले मागे
मार्शच्या विकेटसह बुमराहच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळींची संख्या ४३५ वर पोहोचली आहे. त्याने इशांत शर्माचा ४३४ बळींचा विक्रम मागे टाकला आहे. इशांतने नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्याच्या नावावर कसोटी, एकदिवसीय आणि टी२० मध्ये अनुक्रमे ३११, ११५ आणि ८ विकेट आहेत. बुमराहने कसोटीत १९७, वनडेत १४९ आणि टी-२० मध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत बुमराह आता फक्त कपिल (६८७), झहीर खान (५९७), जवागल श्रीनाथ (५५१) आणि मोहम्मद शमी (४४८) यांच्या मागे आहे.
सॅमने केला खास विक्रम
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सॅम कॉन्स्टास अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना असून पहिल्याच सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. सॅमनेही पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. याशिवाय या युवा खेळाडूने टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्धही अप्रतिम शॉट्स मारले. यादरम्यान त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर दोन उत्तुंग षटकार लगावले. यासह कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात बुमराहविरुद्ध २ षटकार मारणारा सॅम कॉन्स्टास हा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, २०१८ साली इंग्लंडच्या जोस बटलरने ही कामगिरी केली होती.
विराट कोहलीला दंड
चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात विराट कोहली सॅम कॉन्स्टन्सला जाऊन धडकला आणि मैदानावर दोघांमध्ये वाद-विवाद झाला. त्यामुळे पंचांना हस्तक्षेप करायला पुढे यावे लागले. आता आयसीसीने कोहलीला कॉन्स्टास याला धक्का मारल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
विराट कोहलीने आयसीसी नियमांच्या अनुच्छेद २.१२ चे उल्लंघन केले आहे, ज्या अंतर्गत चुकीच्या पद्धतीने कोणत्याही खेळाडूला किंवा अम्पायरला धक्का देणे क्रिकेटमध्ये प्रतिबंधित आहे. जर एखादा खेळाडू मुद्दाम विरोधी खेळाडूच्या दिशेने चालत गेला किंवा कोणत्याही खेळाडूला किंवा अंपायरला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला तर तो शिक्षेस जबाबदार असतो.
मैदानात नेमके काय झाले?
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १०व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. कॉन्स्टासने चेंडूचा बचाव केला, त्यानंतर कोहली चेंडू उचलून ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजाकडे येताना दिसला. दरम्यान, त्याने कॉन्स्टासला खांद्याने धडक दिली, पण १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजानेही मागे न हटता प्रत्युत्तर दिले आणि मैदानावर काहीसे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अखेर पंचांना हस्तक्षेप करावा लागला. यादरम्यान उस्मान ख्वाजाही आपला देशबांधव कॉन्स्टासला समजावताना दिसला. ही घटना पाहून एमसीजी मैदानात उपस्थित ९० हजारांहून अधिक लोकांनी आरडाओरडा सुरू केला.
या घटनेवर समालोचक ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगने कोहलीच्या या कृतीवर आक्षेप घेतला आणि मॅच रेफरीने त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असे सांगितले. अखेर मॅच रेफरीने कारवाई केली, त्यामुळे दंडाव्यतिरिक्त ‘किंग कोहली’ला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनीही कोहलीला असे करण्याची गरज नसल्याचे सांगितले.
खलीस्तानी, भारतीय समर्थक भिडले
दरम्यान, या सामन्याच्या आधी मैदानाबाहेर खलिस्तानी आणि भारतीय समर्थक एकमेकांना भिडल्याचे समोर आले. या घटनेचा व्हीडिओ समोर आला आहे. काही लोक खलिस्तानी झेंडा घेऊन मैदानाबाहेर जमा झाले होते. तसेच, यावेळी त्यांच्याकडून भारतविरोधी घोषणाबाजी केली जात होती. या घोषणाबाजीला भारतीयांना विरोध केला. भारतीय समर्थकांना भारत जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामन्याचे तिकीट नसतानाही खलिस्तानी समर्थकांनी तेथे पोहोचून गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. घटनेनंतर पोलिसांकडून समर्थकांना तेथून बाहेर काढण्यात आले.
भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे वेगवान गोलंदाज
1. कपिल देव : ६८७
2. जहीर खान : ५९७
3. जवागल श्रीनाथ : ५५१
4. मोहम्मद शमी : ४४८
5. जसप्रीत बुमराह : ४३५
6. इशांत शर्मा : ४३४